बार कौन्सिलचा गरजू वकिलांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 09:56 PM2020-04-26T21:56:52+5:302020-04-26T21:57:36+5:30
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या वकिलांना ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा’ने मदतीचा हात दिला आहे. कौन्सिलच्या वतीने गरजू वकिलांना एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची किट वितरित केली जात आहे. आतापर्यंत ५० वकिलांना किट देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या वकिलांना ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा’ने मदतीचा हात दिला आहे. कौन्सिलच्या वतीने गरजू वकिलांना एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची किट वितरित केली जात आहे. आतापर्यंत ५० वकिलांना किट देण्यात आली आहे.
किटमध्ये दहा किलो कणिक, दोन किलो तांदूळ, दोन किलो साखर, दोन किलो तेल, रवा, पोहे, तिखट, मीठ, हळद इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच वकिलांचा व्यवसाय ठप्प आहे. त्यापैकी न्यायालयासह विविध ठिकाणी किरकोळ कामे करून पोटापुरते पैसे कमावणाऱ्या वकिलांवर आर्थिक संकट कोसळले आहे. कमाई बंद झाल्यामुळे कुटुंबाच्या पालनपोषणाचा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. परिणामी, बार कौन्सिलने राज्यातील सर्व गरजू वकिलांना लॉकडाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या माध्यमातून गरजू वकिलांपर्यंत मदत पोहचवली जात आहे. त्याकरिता गरजू वकिलांना मदतीकरिता कौन्सिल किंवा असोसिएशनच्या कार्यालयात किंवा पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधायचा आहे. कौन्सिलचे सदस्य अॅड. अनिल गोवारदीपे यांनी ही माहिती दिली. कौन्सिलचे अन्य सदस्य अॅड.आसिफ कुरेशी, अॅड.पारिजात पांडे, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. कमल सतुजा व महासचिव अॅड.नितीन देशमुख उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.