बार कौन्सिलच्या मतपत्रिकांची फोटोग्राफी ‘बीसीआय’ च्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:04 AM2018-04-03T11:04:24+5:302018-04-03T11:05:50+5:30
बार कौन्सिल आॅफ इंडियाची मंगळवारी दिल्लीमध्ये बैठक असून, त्यात बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या मतपत्रिकांच्या फोटोग्राफीचा विषय मांडला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बार कौन्सिल आॅफ इंडियाची मंगळवारी दिल्लीमध्ये बैठक असून, त्यात बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या मतपत्रिकांच्या फोटोग्राफीचा विषय मांडला जाणार आहे. निवडणुकीशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्थापन निरीक्षण समितीचे सदस्य अॅड. श्यामसुंदर दांगट यांनी ही माहिती दिली.
गेल्या २८ मार्च रोजी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या २५ जागांसाठी निवडणूक झाली. कौन्सिलने मतदार वकिलांना मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास सक्त मनाई केली होती. परंतु, अपवाद वगळता मतदार वकील व निवडणूक कर्मचाऱ्यांनी या नियमाला केराची टोपली दाखविली.
नागपूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आणि जिल्हा व सत्र न्यायालयात मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी वकिलांनी मोबाईल सोबत नेऊन मतदान केले. त्यांनी कौन्सिलचे निर्देश पाळले नाहीच, पण निवडणूक कर्मचाऱ्यांनीही त्यांना मोबाईल जमा करण्यास सांगण्याची तसदी घेतली नाही. काही वकिलांनी याही पुढे जाऊन पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकांचे मोबाईलने फोटो काढले. त्यापैकी एक फोटो ‘लोकमत’च्या हातात आला असून, त्या फोटोवरून संबंधित वकिलाने कुणाला कोणत्या पसंतीचे मतदान केले, हे स्पष्ट दिसून येते. ही घटना गुप्त मतदानाच्या तरतुदीला धक्का पोहोचविणारी व लोकशाहीला तडा देणारी ठरली आहे. निवडणुकीमध्ये याशिवायही अन्य विविध प्रकारची अनियमितता झाली आहे.