बाराखोलीत जुगार अड्डा
By admin | Published: September 29, 2015 04:21 AM2015-09-29T04:21:30+5:302015-09-29T04:21:30+5:30
बाराखोली (इंदोरा) परिसरात खुलेआम जुगार अड्डा सुरू असून, रोज लाखोंची हारजित होत आहे. हारजितच्या
नागपूर : बाराखोली (इंदोरा) परिसरात खुलेआम जुगार अड्डा सुरू असून, रोज लाखोंची हारजित होत आहे. हारजितच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी होणाऱ्या वादामुळे येथे मोठी घटना होण्याची भीती वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना या जुगार अड्ड्याची माहिती असूनही कारवाई केली जात नसल्यामुळे या जुगार अड्ड्याला पोलिसांचा आशीर्वाद असल्याचा आरोप होत आहे.
बाराखोली भागात गेल्या अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू आहे. प्रारंभी तो लपूनछपून चालवला जात होता. अलीकडे जरीपटका ठाण्यातील काही पोलिसांसोबतच गुन्हे शाखेतील काही पोलिसांचीही सेटिंग झाल्यामुळे हा अड्डा खुलेआम सुरू असल्याचे सांगितले जाते. रोज रात्री येथे शहरातील अनेक भागातून जुगारी येतात. पोलिसांकडून कारवाईचा धोका नसल्याचे जुगार भरविणारे सांगत असल्यामुळे येथे अनेक अट्टल जुगारी रात्रभर जुगार खेळतात. धर्मा, मनोज आणि राजू जुगार अड्डा संचालित करतात, अशी माहिती आहे.
अड्ड्यावर लाखोंची हारजित होते. हारणारे दारूच्या नशेत आपला संताप व्यक्त करीत असल्यामुळे येथे वेळोवेळी जुगाऱ्यांमध्ये भांडणेही होतात. तीन दिवसांपूर्वी दोन जुगाऱ्यात मोठा वाद झाला. एकमेकांना पाहून घेण्याची धमकीही देण्यात आली. यावेळी अड्डा भरविणाऱ्याने कशीबशी दोघांची समजूत काढून वाद मिटविल्याचे समजते. मात्र, अशाच प्रकारच्या वादामुळे येथे एखादी मोठी घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जुगार अड्ड्यााचा या भागातील नागरिकांना मोठा त्रास असून, पोलिसांना फोनवरून माहिती देऊनही कारवाई केली जात नसल्याची ओरड आहे. जरीपटका ठाण्यातील काही जण येथे नेहमीच ‘चक्कर’ मारत असल्याचेही सांगितले जाते. पोलीस आयुक्तांनी या अड्ड्यावर अचानक कारवाई करावी, अशी मागणी आहे. अचानक कारवाई झाल्यास येथे लाखोंची रोकड आणि अनेक जुगारी पोलिसांच्या हाती लागू शकतात, अशीही या भागातील नागरिकांमध्ये कुजबूज आहे.(प्रतिनिधी)