‘बारामती ॲग्रो’कडून नागपूर विभागाला ३८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:09 AM2021-05-18T04:09:07+5:302021-05-18T04:09:07+5:30
नागपूर : ‘बारामती ॲग्रो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आमदार रोहित पवार यांच्याकडून कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज पाहता नागपूर विभागाला ...
नागपूर : ‘बारामती ॲग्रो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आमदार रोहित पवार यांच्याकडून कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज पाहता नागपूर विभागाला ३८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे सोमवारी ते सुपूर्द करण्यात आले. विभागात आवश्यकतेनुसार त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.
बारामती ॲग्रोकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याला कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज पाहता ही मदत करण्यात आली आहे. विदर्भात अमरावती विभागात १५ आणि नागपूर विभागासाठी ३८, असे एकूण ५३ कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आले आहे. यापैकी नागपूर विभागासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे १८ आणि नागपूर महानगरपालिकेकडे २० कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आले आहे. बारामती ॲग्रोतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ५०० कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात येत आहे. यावेळी नगरसेवक दुनेश्वर पेठे, नगरसेविका आभा पांडे, बारामती ॲग्रोचे वितरण सहायक व्यवस्थापक सुखदेव नागले, शैलेंद्र तिवारी, अनिल अहिरकर उपस्थित होते.