सलून चालकाच्या मुलीने केला एमपीएससीचा टप्पा सर; सृष्टी नागपुरे बनली आरटीओ इन्स्पेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 15:11 IST2022-10-14T15:07:34+5:302022-10-14T15:11:59+5:30
राज्यसेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात काटोलच्या सृष्टी दिवाकर नागपुरे हिने बाजी मारली आहे.

सलून चालकाच्या मुलीने केला एमपीएससीचा टप्पा सर; सृष्टी नागपुरे बनली आरटीओ इन्स्पेक्टर
सौरभ ढोरे
काटोल (नागपूर) : राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात काटोलच्या सृष्टी दिवाकर नागपुरे हिने बाजी मारली आहे. तिची आरटीओ इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, वडिलांचा सलूनचा व्यवसाय आणि घरच्या बेताच्या परिस्थितीत यावर मात करीत तिन हे यश मिळविले आहे.
वडिलांचे छोटेसे सलून. यात उदरनिर्वाह करताना मुलींना शिकवून मोठे अधिकारी बनवविण्याचे स्वप्न सृष्टीच्या आई- वडिलांनी पाहिले. यात पहिल्या मुलीची गतवर्षी पशुधन अधिकारी म्हणून निवड झाली. यानंतर धाकटीनेही अधिकारी हाेण्याचे स्वप्न उराशी बाळगले. यात तिला यश मिळाले. सृष्टीने वायासीसी कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
खासगी कंपनीत नाेकरी करताना जिद्दीने वेळात वेळ काढून अभ्यास करायचा. ध्येय एकच अधिकारी व्हायचे. याकरिता मोठ्या बहिणीची प्रेरणा आणि आई-वडिलांचे पाठबळ मिळाले.
- सृष्टी नागपुरे