बर्धन यांचे व्यक्तिमत्त्व पक्षातीत होते

By admin | Published: January 8, 2016 04:05 AM2016-01-08T04:05:58+5:302016-01-08T04:05:58+5:30

भाई बर्धन म्हणजे एका विचारधारेशी प्रामाणिक राहणारे आणि आयुष्यभर त्यावर निष्ठा ठेवून तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारे नेतृत्व होते.

Bardhan's personality was in the party | बर्धन यांचे व्यक्तिमत्त्व पक्षातीत होते

बर्धन यांचे व्यक्तिमत्त्व पक्षातीत होते

Next

सर्व राजकीय पक्षांतर्फे आयोजन : मान्यवरांची श्रद्धांजली
नागपूर : भाई बर्धन म्हणजे एका विचारधारेशी प्रामाणिक राहणारे आणि आयुष्यभर त्यावर निष्ठा ठेवून तत्त्वांशी कधीही तडजोड न करणारे नेतृत्व होते. राजकारणात पैशांचा मोह पडतो, संपत्ती जमा करण्याचा मोह होतो; पण या भौतिक मोहाला कधीही बळी न पडता सामान्य गरीब, मजुरांच्या उन्नतीसाठी त्यांनी अखेरपर्यंत कार्य केले. बर्धन हे कम्युनिस्ट पक्षाचे असले तरी त्यांनी त्यांच्या आचरणातून घालून दिलेला आदर्श सर्व पक्षांच्या नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे पक्षाच्या चौकटीच्या बाहेर बर्धन यांचे व्यक्तिमत्त्व फार मोठे होते. ते एक पक्षातीत नेतृत्व होते आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी आदर्श नेतृत्व होते. त्यांची कर्मभूमी नागपूर होती, याचा अभिमान वाटतो. त्यांच्या निधनाने एक सामाजिक, राजकीय मार्गदर्शक आपण गमावल्याचे दु:ख फार मोठे असल्याची शोकसंवेदना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी व्यक्त केली.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्यावतीने सर्वपक्षीय नेत्यांची श्रद्धांजली सभा साई सभागृह, शंकरनगर येथे आयोजित करण्यात आली. याप्रसंगी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी बर्धन यांच्याविषयीच्या शोकसंवेदना व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले, बर्धन यांच्याशी अनेकदा भेटी झाल्या. त्या काळात दक्षिणामूर्ती चौकातील गणेशोत्सवात वादविवाद चालायचे तेव्हा त्यात बर्धन यांचे विचार ऐकायला मिळायचे. त्यांचे ज्ञान आणि अभ्यास वादातीत होता. ते अतिशय संवेदनशील सामाजिक नेते होते. हल्ली समाजात विचारशून्यता आली आहे. विचारभिन्नता ही समस्या नाही, पण विचारशून्यतेचा गंभीर विचार करावा लागतो. कम्युनिस्ट विचारधारेसाठी बर्धन यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर मी भाकपच्या कार्यालयात त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. त्यावेळी माध्यमांमध्ये वादंग निर्माण झाले होते. पण माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर होता म्हणून मी गेलो होतो. काही लोक पदांमुळे मोठे होतात आणि काहींमुळे पदे मोठी होतात. बर्धन पदांना मोठे करणारे होते. आपल्या विचारांशी प्रत्येक स्थितीत प्रामाणिक कसे राहावे, हे बर्धन यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांच्यासारखेच नेतृत्व प्रत्येक क्षेत्रात समोर येणे आज आवश्यक आहे. भारतीय राजकारणाला बर्धन यांनी प्रामाणिकपणा शिकविला. मॉडेल मिल आणि एम्प्रेस मिलच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी केलेला संघर्ष आपण जाणतोच.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी व्यथित होणारे व्यक्तिमत्व
गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी ते फार व्यथित व्हायचे. नागपुरात आता कामगार चळवळ संपली आणि हातमागाचा व्यवसायही संपण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ शासनाच्या प्रयत्नातून संपणार नाहीत. त्यासाठी संपूर्ण समाजाने प्रयत्न करायला हवा, हा विचार बर्धन यांनी व्यक्त केला होता. त्यांच्याच विचारांचा आदर्श आपण अनेक बाबतीत घ्यायला हवा. माझ्यासाठी बर्धन हे एक आदर्श नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे असा सच्चा नेता गमावल्याचे दु:ख वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
माजी खा. बनवारीलाल पुरोहित म्हणाले, बर्धन यांच्या निधनाने नागपूरला धक्का बसला. त्यांनी कायम समाजाच्याच उन्नतीचा विचार केला स्वत:चा विचार कधीच केला नाही. देशातील मजुरांचे हित सांभाळताना त्यांनी जीवाची बाजीही लावली आणि प्रत्येक लढा यशस्वी करून दाखविला. नागपुरातील संघर्षातूनच ते समोर आले आणि दिल्लीत गेले. सत्ताधाऱ्यांनाही त्यांचा निर्णय बदलावायला बाध्य करण्याची विलक्षण शक्ती बर्धन यांच्यात होती. त्यांच्या निधनाने आपण नागपूरचा सुपुत्र गमाविला आहे.
माजी खा. दत्ता मेघे म्हणाले, बहुआयामी आणि विद्याव्यासंगी असलेले बर्धन व्यक्ती नव्हे तर एक संस्था होते. विद्यार्थी चळवळीतून समोर येत त्यांनी स्वत:ला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या निधनाने आपण कामगार सेनानी हरविला आहे. त्यांची उणीव भरून निघणे कठीण आहे कारण त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व आज दुर्मिळ झाले आहे. त्यांनी भाकपचा चेहराच बदलविला. वंचितांशी त्यांची नाळ आयुष्यभर तुटली नाही. त्यांच्या निधनाने एका चळवळीच्या पर्वाचा अंत आणि मार्गदर्शक मित्र गमावला आहे.
कामगार नेते हरिभाऊ केदार म्हणाले, बर्धन हे खऱ्या अर्थाने कामगार चळवळीचे आधारस्तंभ होते. त्यांना गमावल्याची वेदना मोठी आहे. जे ज्येष्ठ नेते आपल्यातून निघून जातात त्यांची जागा घेणारे नवे नेतृत्व मात्र सध्या दिसत नाही. कामगार चळवळीत असे नेतृत्व आता नाही, याची खंत वाटते. केवळ संघटनेचा विचार न करता कामगारांचे हित लक्षात घेऊन सर्व कामगार संघटनांनी एकत्रित काम करायला हवे. तीच आजची गरज आहे आणि बर्धन यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल. उत्तम मित्र, सहज माणूस आणि उत्कृष्ट नेतृत्व त्यांच्या निधनाने आपण गमावले.
अंत:करणापासून कामगार सेवा करणारे बर्धन
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेन्द्र कवाडे म्हणाले, माझी आई मिल कामगार असल्याने तिच्या कडेवर बसून मी आंदोलनात सहभागी झालो होतो. त्यावेळेपासून बर्धन यांना ओळखतो. लोकसभेत ते निवडून गेले नसले तरी संसदेला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले. अंत:करणापासून कामगार सेवा करणारे बर्धन हेच खरे नेतृत्व होते. बाबासाहेबांनी जातीअंतांचा लढा लढला तोच लढा कामगार आंदोलनातून बर्धन यांनी समोर नेला.
रतिनाथ मिश्रा म्हणाले, बर्धन यांनी कधीच संपत्ती जमविली नाही. त्यांचे नागपुरात स्वत:चे घरही नाही. गरिबांच्या हाती सत्ता देण्यासाठी त्यांनी कार्य केले. त्यांची बौद्धिक आणि सामाजिक संपदाच अंतिम व्यक्तीचे उत्थान करू शकते. यानिमित्ताने बर्धन यांना श्रद्धांजली अर्पण करताना आपण काय संकल्प करू शकतो, ते ठरविणे गरजेचे आहे. याप्रसंगी युगल रायलु यांनी बर्धन यांचा गुणगौरव करणारी कविता सादर केली.
शिवसेनेचे माजी खा. प्रकाश जाधव म्हणाले, बर्धन म्हणजे हृदयावर सर्वसामान्यांच्या उन्नतीचा ठेका धरणारे प्रतिभावंत होते. आपण विद्यार्थी असताना त्यांचे नेतृत्व अनुभवले. समाजात अशी माणसे फार कमी असतात त्यामुळेच त्यांच्या निधनाने घरातला माणूस गेल्याचे दु:ख होते आहे.
माजी खा. जांबुवंतराव धोटे म्हणाले, बर्धन यांच्या निधनाने एका तपस्येची अखेर झाली. रामभाऊ रुईकरांनी कामगार चळवळ सुरु केली आणि बर्धन यांनी ती अधिक उंचावर नेली. नागपूर हे त्याकाळात देशाचे कामगार चळवळीचे केंद्र झाले. बर्धन यांचे नेतृत्व सत्तेसाठी कधीच नव्हते तर ते समाजासाठी होते. त्यामुळेच निवडून न येण्याने त्यांना फरकच पडला नाही. माझ्या पाठीशी बर्धन अनेकदा उभे राहिले त्यामुळेच मला काही करता आले.
डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले, त्यांच्या विचारांचा प्रभाव शेअर बाजारवरही होता. एन्रॉनमुळे वीज महाग होईल, हे बर्धन यांनी सांगितले होते. त्यानंतर एन्रॉनचा धुव्वा उडलेला आपण अनुभवले आहे. त्यांनी दिलेला समाजवादच आज दिल्लीच्या प्रदूषणासाठी उपयोगात आणला जात आहे. प्रदूषण थांबविण्यासाठी खासगी वाहनांवर अंकुश आणून दिल्ली शासन सामुदायिक वाहतुकीवर लक्ष देते आहे. त्यामुळे बर्धन यांच्या समाजवादाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
सर्व पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध
गिरीश गांधी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका सांगताना बर्धन यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला. बर्धन हे अजातशत्रू होते. अभ्यास आणि एखादी समस्या तळापासून समजून घेण्याची त्यांची वृत्ती, त्यांचा प्रामाणिकपणा आणि कार्यावर व विचारावर असणारी निष्ठा सध्या दिसत नाही.
माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले, राजकाररणात प्रेम आणि आदर मिळविणारी कमी मंडळी आहेत. त्यात बर्धन अग्रस्थानी होते. त्यांचे जाणे निश्चितच वेदनादायी आहे, असे ते म्हणाले.
ज्येष्ठ विचारवंत मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य म्हणाले, विद्यार्थीदशेपासूनच बर्धन यांच्याशी संबंध राहिला. आम्ही गणेशोत्सवात होणाऱ्या वादविवाद स्पर्धेत अनेकदा सोबत होतो. त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले पण त्यांनी सिद्धांत कधीच सोडले नाहीत. भाकपचे अनेक तुकडे पडले पण ते मूळ पक्षातच राहिले. त्यांनी तडजोड केली असती तर मंत्रिपदही त्यांना मिळाले असते. त्यांचे विचार वेगळे होते पण आमच्यात कधीच शत्रुत्व आले नाही. एक चांगला संवाद आमच्यात होता. ताठ मानेने उभा राहणारा आणि कामावर निष्ठा असणारा हा नेता होता.
महापौर प्रवीण दटके अध्यक्षस्थानावरून म्हणाले, दिल्लीत एका हॉस्पिटलमध्ये ते भरती असताना त्यांच्याशी संवाद झाला. त्यावेळीही त्यांनी १५ मिनिटे संवाद साधताना नागपूरबाबत जाणून घेतले. जनतेच्या प्रश्नांसाठी पक्षांच्या वर कसे जावे, हे बर्धन यांच्याकडून शिकायला हवे.
कॉम्रेड एम. एम. देशकर म्हणाले, सद्यस्थितीत भांडवलशाहीसमोर काही पर्याय नाही. अशा वेळी डाव्यांची समज आणि त्या आधारावर देश चालविण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. विणकर मंडळींसाठी त्यांनी केलेले आंदोलन विसरता येण्यासारखे नाही. भाकपच्या राष्ट्रीय कौन्सिलच्यावतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली.
मनसेचे नेते हेमंत गडकरी म्हणाले, त्यांच्याशी केवळ अर्ध्या मिनिटाची भेट झाली. त्यावेळी त्यांनी जेथे आहे तेथेच निष्ठेने काम करीत रहा, असा संदेश दिला. तो माझ्या आयुष्यात मला उपयोगी पडतो आहे. त्यांच्यापासून सातत्याने मला स्फूर्ती मिळाली. अनेक वर्षे राजकारणात राहूनही त्यांना स्वार्थ शिवला नाही. त्यांच्या जाण्याचे दु:ख आहे.

नागपुरात बर्धन यांचे स्मारक व्हावे
ज्येष्ठ समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनी बर्धन यांना श्रद्धांजली वाहताना बर्धन यांचे स्मारक त्यांच्या कर्मभूमीत व्हावे, अशी मागणी केली. त्यासाठी महापौरांनी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यासह त्यांच्या आठवणीही पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जोगेंद्र कवाडे यांनीही या मागणीला दुजोरा देत त्यांचे स्मारक नागपुरात उभे करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. यावर नितीन गडकरी यांनी त्यांचे स्मारक झाले पाहिजे. यासाठी केंद्र व राज्य शासन शक्य ती मदत करेल, असे जाहीर करताना केवळ स्मारक उभारण्यापेक्षा त्यांच्या विचारांवर त्यांचे काम समोर नेण्याची गरज व्यक्त केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्याच्या कार्यात जांबुवंतराव धोटे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. जागा उपलब्ध व्हायची असेल तर स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही, असा सूर विदर्भवादी कार्यकर्त्यांनी लावला. त्यामुळे वेगळा विदर्भ करा आणि जागा मिळवा, अशी टिपणीही यावेळी जोडली. या विषयाची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. कार्यक्रमाचे संचालन कॉम्रेड मोहन शर्मा यांनी केले. याप्रसंगी दोन मिनिटे मौन पाळून ए.बी. बर्धन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Bardhan's personality was in the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.