वर्दीत लाचखोरांची गर्दी!
By admin | Published: February 28, 2017 01:46 AM2017-02-28T01:46:52+5:302017-02-28T01:46:52+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालयातर्फे २०१६ या एका वर्षात एकूण १३५ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली.
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालयातर्फे २०१६ या एका वर्षात एकूण १३५ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत सापळा प्रकरणांमध्ये २१ टक्क्यांनी घट झाली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे २०१६ मध्येदेखील लाच प्रकरणांत सर्वात जास्त पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी अडकले होते. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१६ या वर्षभरातील लाच प्रकरणे, त्यात अडकलेले अधिकारी-कर्मचारी, झालेली कारवाई इत्यादीसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. यातून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये वर्षात १३५ सापळा प्रकरणांमध्ये १७६ आरोपी अडकले.
एकूण सापळ्यांत अडकलेल्यांमध्ये पोलीस विभागातील ४९ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २०१५ मध्ये महसूल खात्याचादेखील लाचखोरांमध्ये पहिला क्रमांक होता. यंदा ही संख्या घटली असून २०१६ मध्ये ३० जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ््यात अडकले.
शिक्षण विभागातील १३ जणांवर कारवाई झाली. त्यानंतर कृषी व वनविभागातील प्रत्येकी १० तर ग्रामपंचायतेतील ९ जणांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
‘क्लास वन’चे
११ अधिकारी सापळ्यात
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत एकूण १३१ ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली. यात शिक्षण विभागातील ५ तर कृषी, पोलीस, महसूल विभागातील प्रत्येकी २ अधिकारी आहेत. दुसऱ्या श्रेणीतील १७ अधिकाऱ्यांना लाच प्रकरणात पकडण्यात आले. सर्वात कमी म्हणजे ७ कर्मचारी हे चतुर्थ श्रेणीतील निघाले.
पाच वर्षांत ५८६ प्रकरणे
२०१२ पासून नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे लाचखोरीची ५८६ प्रकरणे समोर आणण्यात आली. २०१२ ते २०१५ मध्ये हे प्रकरणांचे प्रमाण सातत्याने वाढत होते. मात्र २०१६ मध्ये एकूण सापळ्यांचे प्रमाण घटलेले आहे.