राज्यात पहिल्यांदा शासकीय रुग्णालयात बेरिॲट्रिक सर्जरी; नागपूरच्या मेडिकल शल्यक्रिया विभागाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 07:00 AM2021-10-10T07:00:00+5:302021-10-10T07:00:06+5:30

Nagpur News ‘ओबेसिटी’ हा लठ्ठपणाशी संबंधित आजार; परंतु त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि मृत्यूला सामोरे जातात. याची दखल घेत पहिल्यांदा मेयो आणि नंतर मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाने ‘बेरिॲट्रिक’ शस्त्रक्रियेला सुरुवात केली आहे.

Bariatric surgery at a government hospital for the first time in the state | राज्यात पहिल्यांदा शासकीय रुग्णालयात बेरिॲट्रिक सर्जरी; नागपूरच्या मेडिकल शल्यक्रिया विभागाचा पुढाकार

राज्यात पहिल्यांदा शासकीय रुग्णालयात बेरिॲट्रिक सर्जरी; नागपूरच्या मेडिकल शल्यक्रिया विभागाचा पुढाकार

googlenewsNext
ठळक मुद्देतब्बल ८०० व्यक्तींचा लठ्ठपणा केला दूर

सुमेध वाघमारे

नागपूर : ‘ओबेसिटी’ हा लठ्ठपणाशी संबंधित आजार; परंतु हा एक आजार असल्याचे फार कमी जणांना माहिती आहे. परिणामी त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि मृत्यूला सामोरे जातात. याची दखल घेत पहिल्यांदा मेयो आणि नंतर मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाने ‘बेरिॲट्रिक’ शस्त्रक्रियेला सुरुवात केली. मागील १२ वर्षांत ८००वर रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करीत त्यांचा लठ्ठपणा दूर केला. विशेष म्हणजे, लठ्ठपणावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात सर्वांत प्रथम डॉ. राज गजभिये यांनी शासकीय रुग्णालयात बेरिॲट्रिक शस्त्रक्रियेला सुरुवात केली. (Bariatric surgery at a government hospital for the first time in the state)

भारतात जंक फूड, अल्कोहोलचे वाढते प्रमाण व अयोग्य जीवनशैलीमुळे पाचपैकी एक पुरुष किंवा स्त्री लठ्ठपणाने ग्रस्त आहे. अनियंत्रित वजनामुळे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, आर्थ्रायटिस, कर्करोग, ॲथरोस्केरासिस, आदी आजारांचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) दरवर्षी २.८ दशलक्ष प्रौढ व्यक्तींचा या फक्त लठ्ठपणाच्या कारणाने मृत्यू होतो. ‘डब्ल्यूएचओ’नुसार ओबेसिटीमुळे ४४ टक्के लोक मधुमेहामुळे, २३ टक्के लोक हृदयरोगामुळे, तर ७.४१ टक्के लोक कर्करोगामुळे बळी पडतात. सर्वाधिक लठ्ठ असलेल्या लोकांमध्ये जगात भारताचा क्रमांक तिसरा लागतो. याची गंभीर दखल घेत मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये बेरिॲट्रिक शस्त्रक्रियेला सुरुवात केली. मेयो आणि मेडिकल मिळून ८०० वर शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

१८४ किलो वजनाच्या पुरुषावर यशस्वी शस्त्रक्रिया

मेडिकलमध्ये आतापर्यंत झालेल्या बेरिॲट्रिक शस्त्रक्रियेमध्ये सर्वाधिक वजनाच्या म्हणजे, १८४ किलो वजनी ५८ वर्षीय पुरुषावर बेरिॲट्रिक सर्जरी डॉ. गजभिये यांनी नुकतीच यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर या पुरुषाचे वजन ८५ किलो झाले असून, या शस्त्रक्रियेमुळे तब्बल ९९ किलो वजन कमी झाले आहे. ते आता सामान्य जीवन जगत आहेत.

- शस्त्रक्रियेत या डॉक्टरांचा सहभाग

डॉ. राज गजभिये यांच्या मार्गदर्शनात ‘बेरिॲट्रिक सर्जरी’मध्ये डॉ. भूपेश तिरपुडे, डॉ. हेमंत भानारकर, डॉ. विक्रांत आकुलवार, डॉ. गायत्री देशपांडे यांच्यासह बधिरीकरण विभाग, निवासी डॉक्टर व परिचारिकांचे सहकार्य मिळत आहे.

- लवकरच रोबोटिक बेरिॲट्रिक सर्जरी 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक जण ‘बेरिॲट्रिक सर्जरी’कडे वळू लागले आहेत. हीच शस्त्रक्रिया आता दुर्बिणीद्वारे जास्तीत जास्त २ सेंटिमीटरचा चिरा देऊन होत आहे. यामुळे शस्त्रक्रियेनंतर व्रण दिसून येत नसल्याने महिलांना याचा फायदा होत आहे. मेडिकलमध्ये लवकच रोबोटिक यंत्र उपलब्ध होणार आहे. यामुळे बेरिॲट्रिक सर्जरी आणखी अचूक होईल.
- डॉ. राज गजभिये
प्रमुख, शल्यक्रिया विभाग, मेडिकल


- मेडिकलमधील बेरियाट्रिक सर्जरी अनेकांसाठी वरदान
मेडिकलमधील शल्यक्रिया विभागात दिवसेंदिवस ‘बेरिॲट्रिक सर्जरी’ची संख्या वाढत आहे. ही ‘सर्जरी’ अनेकँसाठी वरदान ठरत आहे. या विभागाला आणखी अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: Bariatric surgery at a government hospital for the first time in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य