बॅरिकेट्समुळे दुकानात ग्राहकच येत नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:57+5:302021-06-05T04:06:57+5:30
नागपूर : लॉकडाऊन अंतर्गत वेळेच्या निर्बंधामुळे सर्व दुकाने दुपारी २ पर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. कोरोनाचा संसर्ग ...
नागपूर : लॉकडाऊन अंतर्गत वेळेच्या निर्बंधामुळे सर्व दुकाने दुपारी २ पर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी व्हेरायटी चौकापासून लोखंडी पुलाकडे जाणारा मार्ग पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद केल्याने या मार्गावर वाहनांची ये-जा बंद आहे. त्याचा फटका सीताबर्डी येथील व्यापाऱ्यांना बसत असून, बॅरिकेट्समुळे दुकानात ग्राहकच येत नाही, अशी सीताबर्डी मर्चंट असोसिएशनची तक्रार आहे. बॅरिकेट्स हटविण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे.
असोसिएशनचे सचिव हुसेन अजानी म्हणाले, व्हेरायटी चौकातून लोखंडी पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वीच बॅरिकेट्स लावले आहेत. आता प्रशासनाने लॉकडाऊन अंशत: दूर केल्यानंतर बॅरिकेट्स हटविणे आवश्यक आहे, पण गर्दी होत असल्याचे कारण सांगून पोलिसांनी बॅरिकेट्स हटविले नाहीत. त्यामुळे व्हेरायटी चौकातून सीताबर्डी मुख्य मार्गावर कोणतेही वाहन येत नाहीत. अर्थात, कुणी ग्राहक दुकानात खरेदीसाठी येत नसल्याचे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अजानी म्हणाले, सीताबर्डी मर्चंट असोसिएशनचे ३५० पेक्षा जास्त सदस्य अर्थात तेवढेच दुकानदार आहेत. दीड महिन्यानंतर दुकाने सुरू झाली, पण या मार्गावर वाहने नेण्यास मज्जाव असल्याने, चार दिवसांपासून दुकानात ग्राहक येत नाहीत. पुढेही अशीच स्थिती राहिल्यास व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागेल.
वरिष्ठांच्या आदेशानंतरच बॅरिकेट्स हटविणार
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि व्हेरायटी चौक गर्दीचे ठिकाण असल्यामुळे, वरिष्ठांच्या आदेशानुसार या ठिकाणी तीन महिन्यांपूर्वीच बॅरिकेट्स लावून मार्ग बंद केला आहे. त्यामुळे या मार्गावर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आले आहे आणि वाहतूककोंडीची समस्या सुटली आहे, शिवाय फूटपाथवर होणारी गर्दीही थांबली आहे. संपूर्ण लॉकडाऊन हटल्यानंतर आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार बॅरिकेट्स हटविण्यात येईल.
अतुल सबनीस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीताबर्डी.