स्मार्टसिटीच्या बांधकामातील अडथळे हटविले; महापालिका, पोलीस विभागाची कारवाई
By मंगेश व्यवहारे | Published: November 21, 2023 08:29 PM2023-11-21T20:29:04+5:302023-11-21T20:29:19+5:30
पारडी - पुनापूर येथे मनपा, स्मार्ट सिटी आणि पोलिस विभागाची कारवाई
नागपूर : स्मार्ट सिटी अंतर्गत मौजा पारडी-पुनापूर-भरतवाडा येथे सुरू असलेल्या रस्त्याचे बांधकाम प्रभावित करणारे १४ बांधकाम पैकी १० बांधकाम मंगळवारी पाडण्यात आले. नागपूर महानगरपालिका, स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शानात कारवाई करण्यात आली. स्मार्ट सिटीतर्फे मौजा पारडी, पुनापूर, भरतवाडा आणि भांडेवाडी येथे १७३० एकर क्षेत्रामध्ये ‘टेंडर शुअर’ प्रकल्पांतर्गत ५० किलोमीटरच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत मौजा भरतवाडा येथील कळमना बाजार ते पावणगाव रोडच्या कामामध्ये काही घरांचा अडथळा निर्माण होत होता. संबंधितांना वारंवार सूचना आणि नोटीस देवूनही बांधकाम हटविण्यात येत नसल्याने विकास कार्यात निर्माण होणारी बाधा लक्षात घेता मंगळवारी बाधित बांधकाम निर्मूलनाची कारवाई करण्यात आली.