नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटेपर्यंत सुरू राहणार मद्यालये

By मोरेश्वर मानापुरे | Published: December 28, 2023 07:35 PM2023-12-28T19:35:12+5:302023-12-28T19:36:00+5:30

कायद्याचे उल्लंघन केल्यास भरावा लागेल दंड : नियमांतर्गत करावे लागणार आयोजन

Bars will be open till dawn to welcome the New Year in nagpur | नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटेपर्यंत सुरू राहणार मद्यालये

नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटेपर्यंत सुरू राहणार मद्यालये

नागपूर : नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यालये ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतरही सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार बिअरबार आणि क्लब पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात सर्वत्र थर्टी फस्टचे आयोजन करण्यात येते. उत्साहात साजरा होणाऱ्या आयोजनात कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून विभागाने निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

मद्य खरेदीचा परवाना असलेल्यांनाच मद्याची विक्री

मद्य खरेदीचा परवाना असलेल्यांना मद्याची विक्री करण्याची विभागाची परवानगी आहे. एका दिवसासाठी ५ रुपयांचा तात्पुरता परवाना विक्रेते देतात. असे असतानाही मद्य विक्रेते नियम डावलून मद्याची विक्री करीत असल्याचे बहुतांश दुकानांमध्ये दिसून येते. त्यावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने नागपूर जिल्ह्यात हा प्रकार सर्रास सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. लहान मुलांना मद्यविक्री करू नका, अशी नागरिकांची मागणी आहे. शिवाय थर्टी फस्टची पार्टी वा जल्लोषात लहान मुलांचा समावेश करू नका, असे निर्देश विभागाने दिले आहेत.
नियमाच्या उल्लंघन केल्यास होऊ शकतो दंड
नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमात शिथिलता दिली आहे. पण नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार आहे. प्रसंगी दंडही आकारण्यात येणार आहे. कायद्याचे उल्लंघन करून नियमांचे आयोजन करण्यात येत असेल तर आयोजकाला ३ ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा आणि २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी विभागाचे दोन भरारी पथके आणि सहा कार्यकारी पथके कार्यरत राहणार आहेत.
मद्य परत करता येणार
पार्टीत मद्य किती लागणार, याची नोंद आयोजकाला उत्पादन शुल्क विभागाकडे करावी लागणार आहे. तात्पुरता परवाना केवळ पार्टीपुरताच राहणार आहे. पार्टी संपल्यानंतर २४ तासांच्या आत उरलेले मद्य उत्पादन शुल्क विभागाकडे परत करावे लागते. उरलेल्या मद्याचा वापर अन्य ठिकाणी केल्यास परवाना घेतलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमासाठी मनपाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, कार्यक्रमात मद्याचा वापर होत असेल तर उत्पादन शुल्क विभागाची परवानगी बंधनकारक आहे. ग्रामीण भागात ३,३०० रुपये, शहरात ११ हजार आणि व्यावसायिक पार्ट्यांसाठी २२ हजार रुपये शुल्क विभागाकडे भरावे लागेल.

नागरिकांना करता येणार तक्रार
नागरिकांना विभागाच्या मुंबई येथील आयुक्त कार्यालयाच्या सुविधा केंद्रात तक्रार करता येणार आहे. तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. कारवाई पथकाला कुठे कारवाई करायची, याची माहिती दिली जाईल. कायद्याचे पालन करून नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. विभागाने टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ८४२२००११३३ असा आहे.
- अशी असेल वेळ:
- वाईन शॉप (एफएल-२) : सकाळी १० ते मध्यरात्री १ पर्यंत.
- बिअर शॉपी : सकाळी १० ते मध्यरात्री १ पर्यंत.
- बिअरबार : सकाळी ११ ते पहाटे ५ पर्यंत.
- क्लब : सकाळी ११ ते पहाट ५ पर्यंत.

 

Web Title: Bars will be open till dawn to welcome the New Year in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.