‘मल्हार’च्या आधाराने आयुष्य ‘जेजुरी’ झाले
By admin | Published: April 10, 2017 02:48 AM2017-04-10T02:48:50+5:302017-04-10T02:48:50+5:30
वयाची ८० वळणे कधीचीच लोटून गेलेली...वार्धक्याने शरीराचा नुसता सापळा उरलेला...ना हातात बळ ना पायात संवेदना...
निराधार माऊलीच्या जीवनात चैत्राची पालवी : आयुष्याच्या संध्याकाळी मिळाले जगण्याचे बळ
नरेश डोंगरे नागपूर
वयाची ८० वळणे कधीचीच लोटून गेलेली...वार्धक्याने शरीराचा नुसता सापळा उरलेला...ना हातात बळ ना पायात संवेदना...अशा दयनीय अवस्थेत तरुणाईच्या ‘मल्हार‘नामक समूहाच्या नजरेस दुर्दैवी आजी पडली अन् मातृहृदयी तरुणाईला ममतेचा पान्हा फुटला. त्यांनी तिला आधार दिला. त्यामुळे जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या वृद्ध माऊलीच्या जीवनात चैत्राची पालवी फुटली. होय, आप्त-स्वकीय सारेच गमावल्याने स्मृतिभ्रंश झालेली आजी आता मदर टेरेसा शांती भवनात राहायला गेली आहे. तेथे तिच्यासारख्याच अनेकांच्या सोबतीने ती राहणार आहे अन् चैत्राच्या नवचैतन्यात आयुष्याची सायंकाळ घालविणार आहे.
रखरखत्या उन्हात दोन वर्षांपूर्वी ‘मल्हार‘च्या एका सहकाऱ्याला ताजबाग परिसरात अंदाजे ७५ ते ८० वर्षे वयोगटातील ही माऊली भटकताना दिसली. वृद्धत्वामुळे तिला धड चालताही येत नव्हते. तिच्यासारख्यांना आधार देण्यासाठी धडपडणाऱ्या या सहकाऱ्याने ही माहिती मल्हार ग्रुपच्या संयोजिका मेघना गोरे यांना सांगितली. झाले, लगेच मेघना, केदार आंबोकर, आकाश घरडे, दिव्या देरकर, जावेद शेख, अमित गौर, शुभांगी गर्गे, अमित गव्हाणे, मिलिंद आंबेकर आणि त्यांचे सहकारी तेथे पोहोचले. सुरू झाली तिची वास्तपुस्त. या माऊलीने तिच्या आयुष्यात एवढे दु:ख सोसले की तिच्या सर्व आठवणीच गोठल्यात. ती कोण, कुठली, येथे कशी आली, तिचे आप्तस्वकीय कुठे राहतात, यापैकी तिला काहीच आठवत नव्हते. मिळालेला घास तुकडा खायचा अन् नाही काही मिळाले तर ताजबाग परिसरात उघड्यावर हाडं टाकायची, असा तिचा जगण्यासाठी संघर्ष सुरू होता.
भूक लागली की अन्न अन् तहान लागली की लगेच पाणी मिळेल, याचा भरवसा नव्हता. हे सर्व आजूबाजूच्यांकडून कळल्यामुळे मल्हारच्या सहकाऱ्यांनी आजीची जबाबदारी स्वीकारली. तिला रोज घरून जेवण आणून द्यायचे. पाण्याची बाटली आणायची. तिचे खाणे-पिणे करतानाच आंघोळ घालून द्यायची अन् प्रत्येकाने जाता-येता तिच्यावर लक्ष ठेवायचे, असे सुरू झाले. तिला येथे सोडून गेलेले नातेवाईक परत येतील अन् आजीला घेऊन जातील, अशी मल्हारला आशा होती. त्यामुळे आजीला येथे मुद्दामहून ठेवण्यात आले होते. मात्र, तब्बल दोन वर्षे झाली. कुणी तिच्याकडे फिरकलेच नाही.
हो, एक चांगले घडले. मल्हारच्या सहकाऱ्यांचा या बिचाऱ्या वृद्ध जीवालासुद्धा आता लळा लागला होता. ती रोज त्यांचीच वाट बघत बसायची. बोलता येत नसले तरी तिचे डोळे त्याची साक्ष पटवत होते. मल्हारचा सहकारी आला की तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक यायची. त्यानंतर व्हायचा एकमेकाना स्रेहाचा स्पर्श अन् सुरू व्हायचा मूक संवाद. तब्बल २४ महिने हा स्रेहसंवाद चालला.
पानगळ अन् पालवी !
आता उन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. एकीकडे पानगळ सुरू आहे अन् दुसरीकडे चैत्राच्या नवचैतन्याची पालवीही फुटत आहे. मात्र, आजीचे आप्तस्वकीय तिला घेण्यासाठी येण्याची आशा मावळली आहे. त्यात आजीच्या रूपातील पिकले पान कधीही गळू शकते याचे संकेत मिळत आहे. असे काही झाले तर आजी तशीच पडून राहू नये, अशी चिंता मल्हारला सतावू लागली. तसे होऊ नये म्हणून विचारमंथनही सुरू झाले. पिकल्या पानाला व्यवस्थित आधार देण्याचे अनेक पर्याय पुढे आले. त्यानुसार पोलीस लाईनजवळच्या मदर टेरेसा ‘शांती भवनात (वृध्दाश्रमात) बोलणी झाली अन् दोन दिवसांपूर्वी आजीला तेथे पोहचवण्यात आले. आजीसारखेच अनेक जीव तेथे आयुष्याची सायंकाळ घालवत आहे. कित्येकांना आप्त नसल्याने शांती भवनात यावे लागले आहे. मात्र, कित्येकांचे आप्त असूनही त्यांना येथे राहावे लागत आहे. फारशा गरजा नाही, केवळ दोन वेळचा घासतुकडा अन् चहा एवढीच त्यांची घरच्यांकडून अपेक्षा. आप्तांकडून चार प्रेमाचे शब्द मिळावेत, नातवंडांचे बोबडे बोल ऐकायला, त्यांचे कोडकौतुक बघायला मिळावे यासाठी आसुसलेली ही मंडळी म्हणूनच घर सोडायला तयार नसतात. मात्र, जाणिवा बोथट झालेल्या कित्येक आप्तांनी आजीसारख्या अनेकांना येथे जाणीवपूर्वकच आणून सोडले आहे. आजीचीही त्यात भर पडली आहे. मात्र, तिला येथे आणून सोडण्यामागचा उद्देश पवित्र आहे. उघड्यावर बेवारसासारखे जगणे नशिबी आलेल्या आजीला बेवारस मरणे वाट्याला येऊ नये म्हणून मल्हारने तिला येथे आणून सोडले आहे. रक्ताच्या नातेवाईकांची साथ नसली तरी ‘मल्हार‘च्या आधाराने आजीचे उरलेले आयुष्य ‘जेजुरी’ झाले आहे.
आणखी एक मोठेपणा
मल्हारचे सहकारी खऱ्या अर्थाने समाजसेवा करीत आहेत. स्मृतिभ्रंश झालेली इंदूर (मध्यप्रदेश) मधील आजारी वृद्धा महिनाभर मेयोत पडून होती. तहसील पोलीस ठाण्यातून ही माहिती कळल्यानंतर मल्हारचे सहकारी धावले. तिचे खाणेपिणे, शुश्रूषा करतानाच महिनाभर सलग प्रयत्न करून त्यांनी तिच्या नातेवाईकांचा नाव, पत्ता शोधला. त्यांच्याशी संपर्क करून तीन आठवड्यांपूर्वी तिला सुखरूप इंदूरला तिच्या मुलाच्या घरी पोहोचवण्यास मदत केली. ही आणि अशी अनेक चांगली कामे त्यांनी आतापावेतो केली आहे. मात्र, प्रसिद्धीविमुख राहूनच ही मंडळी कार्यरत आहे. मल्हारचा हा आणखी एक मोठेपणा आहे.