जैन धर्म विज्ञान आधारित, भक्तामर गाथांमध्ये मोठी शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:30+5:302021-05-10T04:08:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जैन धर्म पूर्णतः विज्ञानावर आधारित आहे. आचार्य मानतुंग यांनी पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ यांच्या ...

Based on the science of Jainism, great power in Bhaktamar Gathas | जैन धर्म विज्ञान आधारित, भक्तामर गाथांमध्ये मोठी शक्ती

जैन धर्म विज्ञान आधारित, भक्तामर गाथांमध्ये मोठी शक्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जैन धर्म पूर्णतः विज्ञानावर आधारित आहे. आचार्य मानतुंग यांनी पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ यांच्या स्तुतीत रचलेल्या भक्तामर गाथांमध्ये मोठी शक्ती आहे, असे प्रतिपादन सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. सिद्धायतन संस्था, संगम फाउंडेशन, आईव्हीएस हिलिंग सेंटर आणि जीतो लेडीज विंग, रायपूर यांच्या वतीने कोविडच्या दुसऱ्या घातक लाटेमध्ये भक्तामर हिलिंगद्वारे व आपली दिव्य शक्ती जागृत करून सकारात्मक ऊर्जेसोबत महामारीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आयोजित सातदिवसीय आंतरिक यात्रेच्या ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान शनिवारी मुख्य अतिथी म्हणून दर्डा बोलत होते.

भक्तामरची सहावी गाथा बुद्धीच्या विकासात यशस्वी झाली आहे. कुठली गोष्ट हरविली असेल, तर अकराव्या गाथेतून यश मिळते. ४५ वी गाथा आजारांचा सामना करण्यात प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. काही लोकांनी कर्करोगासारख्या आजारातदेखील या गाथेचा प्रयोग केल्याची मला जाण आहे. मात्र, त्या माध्यमातून चांगले-वाईट झाले आहे, याचे प्रमाण नाही. केवळ मान्यता आहे. त्यामुळेच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जी औषधे घेत असाल ती कायम ठेवा, त्यांना बंद करू नका, असे प्रतिपादन दर्डा यांनी केले. यावेळी त्यांनी क्षमा, जगा आणि जगू द्या, तसेच अपरिग्रहाच्या महतीवरदेखील प्रकाश टाकला.

सातदिवसीय आंतरिक यात्रा कार्यक्रमाच्या ऑनलाइन आयोजनाला ६ मे रोजी सुरुवात झाली व हा उपक्रम १२ मेपर्यंत चालेल. डॉ. मंजू जैन यांनी भक्तामर पाठाला देशविदेशातील जैन व इतर धर्मीय बांधवांमध्ये विविध केंद्रांच्या माध्यमातून पोहोचविण्याचे कार्य केले आहे. नागपुरातदेखील मोठी प्रयोगशाळा बनते आहे. तेथे या सर्व गाथांच्या माध्यमातून प्रयोग होणार आहेत. या आयोजनात इंटरनॅशनल स्पिरिच्युअर हिलर डॉ. मंजू जैन आणि वेलनेस कोच-स्पिरिच्युअल हिलर सोनल जैन-जैसवाल कोरोना महामारीदरम्यान भक्तामर हिलिंग आणि अंतर्गत शक्ती जागृत करण्यासंदर्भात उपाय सांगत आहेत.

कार्यक्रमात मधुस्मिताजी म.सा., प्रेरणाजी म.सा. यांच्यासमवेत सिद्धायतन संस्थेच्या मॅनेजिंग ललिता जैन सेठी (कोलकाता), संगम फाउंडेशनच्या संस्थापक नीरज सुराणा, आईव्हीएस हिलिंग सेंटरचे संचालक विनय जैन, जीतो लेडीज विंग रायपूरच्या अध्यक्षा कुसुम श्रीश्रीमाल, विशाखापट्टणमचे उद्योगपती मनोज जैसवाल यांच्यासमवेत शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. सीए संतोष जैन (कोलकाता) यांनी मुख्य अतिथींचा परिचय करून दिला. मधुस्मिताजी म.सा. यांनी मंगलाचरण व प्रार्थना केली. कार्यक्रमाचे संचालन नीरज सुराणा यांनी केले.

आत्म्याला जागृत करा

भक्तामर स्तोत्राच्या एकेका श्लोकात अपार शक्ती आहे. यातून नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात सकारात्मकता येते. या मंत्रामुळे लोकांचे आजार, सुख, बुद्धिमत्ता आणि समृद्धीसोबतच आयुष्याला पूर्ण तऱ्हेने यशस्वी बनविण्यासंदर्भात प्रभाव टाकतात. या मंत्रांच्या माध्यमातून आत्म्याला जागृत करता येते, असे मंजू जैन यांनी सांगितले.

चक्रांचे सांगितले महत्त्व

सोनल जैन-जैसवाल यांनी कुंडलिनीतील मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा, सहास्रार या सात चक्रांबाबत माहिती दिली. जसे जसे चक्र खुलत जातात, आपले भाव शुद्ध होत जातात व आपल्याला आतून सुख-शांतीचा अनुभव होतो, असे त्यांनी सांगितले. भगवंत सर्वांच्याच आत आहेत. त्यांना मिळविण्यासाठी मन स्वच्छ व भाव पवित्र असला पाहिजे. जे मनात आहे, तेच तोंडीदेखील असले पाहिजे, असे प्रतिपादन मनोज जैसवाल यांनी केले.

Web Title: Based on the science of Jainism, great power in Bhaktamar Gathas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.