बसस्थानक की कचराघर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:36 AM2017-09-26T00:36:09+5:302017-09-26T00:36:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धापनदिनी प्रवाशांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करणाºया एसटी महामंडळाकडून प्रवाशांची कशी हेळसांड करण्यात येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गणेशपेठ बसस्थानक आहे. येथे प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरविण्यात प्रशासन निष्क्रिय ठरत आहे. प्रवाशांना बसची वाट पाहत घाणीच्या विळख्यात बसस्थानकावर बसावे लागत आहे. एकीकडे प्रवासी मिळत नसल्यामुळे महामंडळ विविध योजना आखून प्रवाशांना आकर्षित करण्याचा खटाटोप करते अन् दुसरीकडे महामंडळातील अधिकारी, कर्मचाºयांच्या कामचुकारपणामुळे प्रवाशांची हेळसांड होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एसटी महामंडळाच्या गणेशपेठ बसस्थानकावर कचºयाचे साम्राज्य पसरले असून, प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या सिमेंटच्या बाकावर, शेजारी घाण साचल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीयुक्त वातावरणात बसून बसची वाट पाहावी लागत आहे. गणेशपेठ बसस्थानकावरून दिवसाकाठी हजारो प्रवासी ये-जा करतात.
एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत असलेल्या या प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे हे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत असल्याची स्थिती आहे.
मूलभूत सुविधांचा अभाव
प्रवाशांच्या सुविधेसाठी गणेशपेठ बसस्थानकावर पंखे बसविण्यात आलेले आहेत. परंतु येथील बहुतांश पंखे बंद अवस्थेत आढळले. त्यामुळे प्रवाशांना उकाड्यात बसण्याची पाळी आली आहे. याशिवाय प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या नळाच्या बाजूला प्रचंड घाण साचल्याचे चित्र दृष्टीस पडले. त्यामुळे या ठिकाणी उभे राहून पाणी पिण्याची इच्छाही होणार नाही, अशीच येथील परिस्थिती आढळली.
प्लॅटफार्मवर बसणेही मुश्कील
प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या सिमेंटच्या बाकांच्या खाली, बाजूला कचरा, केळीचे साल फेकलेले दिसले. येथील कचरा साफ करताना एकही सफाई कर्मचारी दिसला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवासी आपली बस येईपर्यंत थोडी स्वच्छ दिसेल अशा जागेचा शोध घेऊन त्या जागेवर बसताना आढळले.
मोकाट कुत्र्यांचा वावर
बसस्थानकावर जवळपास १० ते १५ मोकाट कुत्री फिरताना आढळली. प्रवासी बसतात त्या प्लॅटफार्मच्या जवळ, चौकशी कक्ष, बसेस उभ्या राहण्याच्या ठिकाणी ही कुत्री फिरताना आढळली. ही मोकाट कुत्री प्रवाशांना चावण्याची भीती असून, त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
परिसरातच कचºयाचा ढीग
बसस्थानकाच्या आत जाणाºया गेटच्या बाजूला भलामोठा कचºयाचा ढीग साचलेला दिसला. हा कचरा मागील अनेक दिवसांपासून उचलण्यात आलेला नसल्याचे खुद्द महामंडळाच्याच कर्मचाºयांनी सांगितले. या साचलेल्या कचºयाची दुर्गंधीही परिसरात पसरत असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.
अधिकाºयांचे कमालीचे दुर्लक्ष
गणेशपेठ बसस्थानकावर प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. परंतु याकडे लक्ष पुरविण्यास एकाही अधिकाºयाला वेळ नसल्याचे दिसत आहे. मुख्यालयातून आदेश आल्यामुळे वर्धापन दिनाला प्रवाशांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करणारे एसटीचे अधिकारी प्रवाशांच्या सुविधांबाबत कसे उदासीन आहेत, याची प्रचिती गणेशपेठ बसस्थानकावर फेरफटका मारताना आली.
संबंधित अधिकाºयास विचारणा करू
‘प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत असेल तर निश्चितच ही गंभीर बाब आहे. बसस्थानक परिसर स्वच्छ राहावा असा नेहमीच आमचा प्रयत्न असतो. गणेशपेठ बसस्थानकावरील अस्वच्छतेबाबत संबंधित आगारप्रमुखास विचारणा करण्यात येईल.’
-चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी,
एसटी महामंडळ, नागपूर विभाग