पीडित, अत्याचारग्रस्त महिलांना हक्काचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:08 AM2021-02-24T04:08:43+5:302021-02-24T04:08:43+5:30
‘सखी वन स्टॉप सेंटर’चा पुढाकार : निवारा, कायदेशीर सल्ला आणि सुरक्षाही प्रदान नागपूर : महिलांच्या सुरक्षेविषयी देशभरात चिंता ...
‘सखी वन स्टॉप सेंटर’चा पुढाकार : निवारा, कायदेशीर सल्ला आणि सुरक्षाही प्रदान
नागपूर : महिलांच्या सुरक्षेविषयी देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. कारण अत्याचार, लैंगिक शोषणाच्या घटना वाढतच आहे. पोलीस खात्याने महिलांना ‘भरोसा’ दिला आहे. पण संकटग्रस्त महिलांना तत्काळ आधार देण्याचे काम ‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या माध्यमातून होत आहे. केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे ‘सखी वन स्टॉप सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. नागपुरात जुलै महिन्यात हे सेंटर सुरू झाले. अवघ्या काही महिन्यातच शेकडो पीडित, अत्याचारग्रस्त महिलांना त्याचा आधार झाला.
जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली नागपुरात पाटणकर चौकात हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. कौटुंबिक हिंसाचार पीडित, लैंगिक शोषणाच्या पीडित, मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या, रस्ता भरकटलेल्या, संरक्षणाची गरज असलेल्या महिलांसाठी हे केंद्र एक आधार म्हणून पुढे येत आहे. पाच दिवसांचा निवारा, कायदेशीर मदत, आरोग्याच्या सुविधा, पोलिसांची सुरक्षा या केंद्राच्या माध्यमातून महिलांना मिळत आहे.
नागपूर जिल्ह्यात हे केंद्र असले तरी, याचा लाभ इतर राज्यातील महिलांनाही मिळाला आहे. लॉकडाऊनच्या काळात या केंद्राचा फायदा तामिळनाडू, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील महिलांनाही झाला आहे. हरविलेल्या महिला, मुलींना सुरक्षा प्रदान करून, त्यांच्या घरापर्यंत पोहचवून देण्यात केंद्राला यश आले आहे.
जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्या मार्गदर्शनात नागपूरचे सखी वन स्टॉप सेंटर भारतीय स्त्री संस्थेच्या माध्यमातून संचालित करण्यात येत आहे.
- केंद्र २४ बाय ७ कार्यरत
पाटणकर चौकातील शासकीय करुणा महिला वसतिगृह परिसरात असलेले हे केंद्र २४ बाय ७ सुरू असते. केंद्रात व्यवस्थापक, केस वर्कर, समुपदेशक, वकील, डॉक्टर, नर्स, पोलिसांची चमू पीडितेला मानसिक समुपदेशन, सुरक्षा, मदत व पाच दिवसांचा अल्प निवारा उपलब्ध करून देते. या केंद्राची मदत हवी असेल तर ०७१२-२९५७९५१ यावर संपर्क साधावा.
- केंद्राने यांना पुरविल्या सुविधा
जुलै महिन्यापासून केंद्राकडे २१७ पीडित महिलांनी आधार शोधला आहे. यात कौटुंबिक हिंसाचाराच्या ११५ केसेस आहेत. ३६ महिलांचे समुपदेशन करून त्यांना कुटुंबात सुखरूप पाठविले आहे. राज्यात व राज्याबाहेरून बेपत्ता असलेल्या १२ महिलांना सुरक्षा मिळवून दिली आहे. ३३ महिलांना कायद्याचा सल्ला, १३ महिलांना पोलिसांची मदत केली आहे.
- पोलिसांच्या माध्यमातून अथवा महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून महिला केंद्रात येतात. संकटग्रस्त असलेल्या महिलांना त्यांच्या गरजेनुसार साहाय्य देऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढवून महिला सक्षमीकरणाचे तसेच कुटुंबसंस्था बळकट करण्याचे काम यशस्वीरीत्या होत आहे.
अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी