मुलींची गळती रोखण्यासाठी ‘सावित्री’चाच आधार
By admin | Published: March 10, 2016 03:36 AM2016-03-10T03:36:39+5:302016-03-10T03:36:39+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आज सर्वच समाजातील महिलाही शिकू लागल्या. उच्च पदावर पोहचू लागल्या.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती : लाखो मागासवर्गीय मुलींना लाभ
नागपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आज सर्वच समाजातील महिलाही शिकू लागल्या. उच्च पदावर पोहचू लागल्या. महिलांचे विशेषत: मागासवर्गीय मुलींचे प्रमाण वाढले. मात्र काही वर्षांपासून या मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाणही झपाट्याने वाढले होते. त्याचे सर्वात मोठे कारण आर्थिक परिस्थिती हेच होते. या मुलींची विशेषत: भटके विमुक्त व मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींची शाळा मध्येच सुटू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आणि या मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या योजनेमुळे मुलींची शाळा गळती थांबवण्यात काही प्रमाणात का असेना शासनाला यश आले. समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणारी ही योजना म्हणजे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना होय. ज्या मुलीसाठी शिक्षणाची दारे उघडी केली त्या लेकींची शाळा मध्ये सुटू नये, त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करावे, यासाठी पुन्हा एकदा सावित्रीचाच आधार मिळत आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आज सर्वच क्षेत्रातील मुली चांगले शिक्षण घेत आहेत. मागासवर्गीय समाजातील मुलीसुद्धा यात मागे नाही. मागील काही वर्षांमध्ये मागासवर्गीय मुलींचे शिक्षणाचे प्रमाण चांगले होते. परंतु ५ वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींपैकी अनेक मुली १० वीपर्यंत पोहोचतच नव्हत्या. त्या मध्येच शाळा सोडून देत होत्या. हे प्रमाण कालांतराने वाढत गेले. विशेषत: पाचवी ते दहावीत याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते.
ही बाब लक्षात घेऊन इयत्ता ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या मुलींसाठी महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. सुरुवातीला ५ वी ते ७ वी साठी १९९६ मध्ये शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर त्याचा विस्तार करीत २००३ पासून ८ वी ते १० वीतील मागासवर्गीय मुलींनाही ही शिष्यवृत्ती दिली जाते. ५ वी ते ७ वीतील मागासवर्गीय मुलींना दरमहा ६० रुपये अशी एकूण १० महिने म्हणजे ६०० रुपये शिष्यवृत्ती मिळते. तर ८ वी ते १० वीतील मागासवर्गीय मुलींना दरमहा १०० रुपये याप्रमाणे वर्षाचे हजार रुपये मिळते.
यासाठी उत्पन्न व गुणांची अट नाही. संबंधित मुलींना अर्ज करण्याचीही आवश्यकता नाही. यासाठी आॅनलाईन अर्ज भरावयाचे असून ते शाळांनाच भरावे लागतात. २०१३ पासून ही शिष्यवृत्ती योजना आॅनलाईन करण्यात आली आहे.
२०१३-१४ य शैक्षणिक वर्षात एकूण १० लाख ४७ हजार ८१५ मागासवर्गीय मुुलींचे अर्ज आले. यात अनुसूचित जातीच्या ५ लाख १३ हजार ४३५ मुली, विशेष मागास प्रवर्गाच्या ६१ हजार १०५ मुली व भटके विमुक्त जातीतील ४ लाख ७३ हजार २७५ मुलींचे शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त झाले.
२०१४-१५ या शैक्षणिक वर्षात या योजनेंतर्गत एकूण ९ लाख २७ हजार ३१२ मुलींनी अर्ज केला होता. यामध्ये अनुसूचित जातीच्या ३ लाख ९० हजार ५२१, विशेष मागास प्रवर्गातील ५८ हजार १०५ आणि भटके जमातीच्या ४ लाख ७८ हजार ६८६ मुलींचे शिष्यवृत्ती अर्ज शासनाकडे प्राप्त झाले.
२०१५-१६ या शैक्षणिक वर्षाचा विचार केला असता या वर्षात ९ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यातील शाळांमधून एकूण ८ लाख ५५ हजार ८४८ मुलींचे अर्ज आले आहेत. यामध्ये अनुसूचित जमातींच्या मुलींचे ३ लाख ७० हजार ६४९ अर्ज आले आहेत. विशेष मागास प्रवर्गाच्या मुलींचे ५०,१४६ आणि भटक्या विमुक्त जातीच्या ४ लाख ३५ हजार ५३ मुलींचे शिष्यवृत्ती अर्ज शासनाला प्राप्त झाले आहेत. या शिष्यवृत्तीमुळे संबंधित मुलींना होणार आर्थिक मदत फार नसली तरी थोडीफार आधार देणारी नक्कीच आहे. त्यामुळे लाखो मागासवर्गीय मुलींचे शाळा गळती प्रमाण रोखण्यास काहीप्रमाणातच यश आले आहे. (प्रतिनिधी)