खेळणं खेळताना झाला बॅटरीचा स्फोट; बालकाचा गाल फाटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 07:28 PM2023-06-22T19:28:12+5:302023-06-22T19:41:57+5:30
Nagpur News बॅटरीवर चालणाऱ्या चक्रीला पेपर गुंडाळून हवा घेत असताना बॅटरीचा स्फाेट झाला आणि नऊ वर्षी बालक गंभीररीत्या जखमी झाला.
नागपूर : बॅटरीवर चालणाऱ्या चक्रीला पेपर गुंडाळून हवा घेत असताना बॅटरीचा स्फाेट झाला आणि नऊ वर्षी बालक गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना सावनेर शहरातील रेल्वेस्थानक परिसरात गुरुवारी (दि. २२) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. जखमी बालकावर नागपूर शहरात उपचार सुरू आहेत.
चिराग प्रवीण पाटील (९, रा. रेल्वे क्वाॅर्टर, रेल्वेस्थानक परिसर, सावनेर) असे जखमी बालकाचे नाव आहे. चिराग गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे घरी इलेक्ट्राॅनिक्सच्या वस्तूंसाेबत खेळत हाेता. यात त्याने एका चक्रीला पेपरचे तुकडे लावले आणि जाड्या सेल (बॅटरी)चे कनेक्शन चक्रीला जाेडून त्याची हवा घेत हाेता. ही चक्री त्याने त्याच्या चेहऱ्याजवळ धरली हाेती. काही वेळात बॅटरी गरम हाेताच स्फाेट झाला. यात त्याच्या डाव्या गालाला गंभीर दुखापत झाली. घटनेच्यावेळी चिरागचे आजाेबा व भाऊ घरी हाेता.
माहिती मिळताच हितेश बन्साेड यांनी त्याला शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डाॅ. मयूर डाेंगरे यांनी त्याच्यावर प्रथमाेपचार केले. त्यानंतर त्याला नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले. स्फाेटामुळे चिरागच्या डाेक्याला फारशी इजा झाली नसली तरी डावा कान, घसा व मेंदू प्रभावित झाला आहे, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली. स्फाेट झालेली बॅटरी सुमार दर्जाची व चायना मेड असल्याची माहितीच चिरागच्या वडिलांनी दिली.
इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंसाेबत खेळण्याची सवय
चिराग सावनेर शहरातील सुभाष प्राथमिक शाळेत शिकताे. ताे यावर्षी इयत्ता चाैथीत गेला हाेता. त्याला ११ वर्षाचा माेठा भाऊ असून, वडील शहरातील वाॅटर कुलिंग कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात तर आई घरकाम करते. त्याचे आजाेबा रेल्वेत नाेकरीला असल्याने ते रेल्वे क्वाॅर्टरमध्ये राहतात. चिराग व त्याच्या माेठ्या भावाला इलेक्ट्राॅनिक्सच्या वस्तूंसाेबत खेळण्याची सवय आहे. वारंवार मनाई करूनही त्यांची ही सवय गेली नाही, अशी माहिती त्याच्या आजाेबाने दिली. याच सवयीतून चिराग व त्याच्या भावाने इलेक्ट्राॅनिक्सच्या वेगवेगळ्या वस्तू गाेळा केल्या आहेत.
...