राज्यातील १७,५१० कनेक्शनची बत्ती गुल; सर्वाधिक तक्रारी नागपूर विभागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 08:00 AM2023-06-28T08:00:00+5:302023-06-28T08:00:01+5:30
Nagpur News राज्यात १७ हजार ५१० वीज कनेक्शन तांत्रिक त्रुटींमुळे बंद पडले आहेत. यापैकी ५६ कनेक्शन तर दोन महिन्यांपासून बंद आहेत.
कमल शर्मा
नागपूर : महावितरणच्या कार्यप्रणालीमुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. तक्रारींची दखल घेतली जात नाही. याचा अंदाज यावरूनच येतो की राज्यात १७ हजार ५१० वीज कनेक्शन तांत्रिक त्रुटींमुळे बंद पडले आहेत. यापैकी ५६ कनेक्शन तर दोन महिन्यांपासून बंद आहेत. महावितरणच्या अहवालात याची नोंद असल्यामुळे याची माहिती महावितरणलाही असल्याचे स्पष्ट होते. मात्र, त्यानंतरही महावितरणने उपाययोजनेसाठी पुढाकार घेतलेला नाही.
महावितरणच्या अहवालात २२ जूनपर्यंतची स्थिती मांडण्यात आली आहे. यात जे कनेक्शन बंद असल्याच्या तक्रारी प्रलंबित आहेत, अशांचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, महावितरणचे अधिकारी व्यक्तिगत तक्रारी स्वीकारतात. मात्र, त्याच्यावर उपाय योजण्यात दिरंगाई करतात. बंद असलेल्यांमध्ये सर्वाधिक कनेक्शन नागपूर विभागातील (विदर्भ) आहेत. महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी मुख्य अभियंत्यांना या बंद कनेक्शनकडे स्वत: लक्ष देऊन तत्काळ उपाय योजण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिकारी काय म्हणतात?
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अहवालात नमूद करण्यात आलेली स्थिती व वास्तव यात फरक असल्याचे सांगितले. बहुतांश बंद कनेक्शनचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. फक्त लाइनमनने तक्रारी ‘क्लोज’ (बंद) केल्या नाहीत. त्यामुळे अहवालातील आकडा मोठा दिसतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.