२०१९ ची लढाई पुन्हा मुद्यांवर होणार : रामदेवबाबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 05:44 PM2018-07-21T17:44:27+5:302018-07-21T18:34:39+5:30
आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक ही पुन्हा एकदा मुद्यांवर आधारित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले आहे की, ते त्यांनी केलेल्या कामांचा हिशोब सादर करतील. तर विरोधकही आपले मुद्दे लावून धरतील. आता देशाचे हृदय कोण जिंकेल हे येणारी वेळच ठरवेल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी येथे सांगितले. रामदेवबाबा हे शनिवारी काही कामानिमित्त शहरात आले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक ही पुन्हा एकदा मुद्यांवर आधारित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले आहे की, ते त्यांनी केलेल्या कामांचा हिशोब सादर करतील. तर विरोधकही आपले मुद्दे लावून धरतील. आता देशाचे हृदय कोण जिंकेल हे येणारी वेळच ठरवेल, असे योगगुरू रामदेवबाबा यांनी येथे सांगितले.
रामदेवबाबा हे शनिवारी काही कामानिमित्त शहरात आले होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
काळा पैसा, भ्रष्टाचार आणि व्यवस्था परिवर्तन हे तीन मुद्दे महत्त्वाचे होते. काळा पैसा देशातील व्यवस्थेत किंवा विदेशातील बँकेत असो. त्यासाठी सरकारने काही कामे निश्चित केली. विदेशातील बँकेत काळा पैसा आहे, तो अजूनही मोठा प्रश्न आहे. भ्रष्टाचार अजूनही देशावरील जखम आहे. यासाठी खालून वरपर्यंत काम करण्याची गरज आहे. व्यवस्था परिवर्तनासाठी खूप मोठे काम करण्याची गरज आहे. मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीऐवजी या देशातील शिक्षण पद्धत आणून पुन्हा या देशाला वैभव प्राप्त करावे.
पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने रोजगाराचे आकडे सादर केले, त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता रामदेवबाबा म्हणाले, राजकारणात आकड्यांचाही वेगळाच प्रकारचा खेळ असतो. त्यात मला पडायचे नाही. परंतु इतके निश्चित सर्वांनाच या दिशेने एक प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. कारण देशात बेरोजगारी, गरिबी, भूक, असमानता मोठे मुद्दे आहेत. सामाजिक न्याय, आर्थिक न्यायासाठी व रोजगारासाठी, शेतकऱ्यांसाठी सर्वांनाच प्रयत्न करायला हवे, आम्हीही करीत आहोत. आम्ही एका महिन्यात ११ हजार लोकांना नोकरी दिली. अजून दोन-तीन महिन्यात देणार असून डिसेंबरपर्यंत २० हजार लोकांना नोकरी देणार. येणाºया दिवसात पाच लाख लोकांना रोजगार देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हे काम आम्ही देशसेवेचे व्रत म्हणून करतोय, असेही रामदेवबाबा यांनी सांगितले.
मतभेद असावे मनभेद असू नये
विश्वासमतावरील भाषणानंतर राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांची गळा भेट घेतली, त्यावरून देशात गदरोळ माजला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता रामदेवबाबा म्हणाले, सरकारकडे विश्वासमतापेक्षा अधिक नंबर अगोदरच होते. त्यामुळे जिंकणे निश्चित होतेच. मात्र सत्तापक्ष व विरोधी पक्षात या माध्यमातून मुद्यांवर आधारित चर्चा घडून आली. ती लोकशाही परंपरेसाठी चांगले आहे. राजकीय पक्षांमध्ये मुद्यांवर आधारित, विचार, धोरणे, सिद्धांतांवर आधारित विरोध व समर्थन असणे आवश्यक आहे. पण मनात वैमनस्य असू नये. मतभेद असावे पण मनभेद असून नये. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. राहुल गांधी यांनी सभागृहात डोळा मारण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.