बावनकुळे यांच्याकडे कोट्यवधींचा काळा पैसा; नातेवाईकाचा खळबळजनक आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 07:30 AM2022-02-01T07:30:00+5:302022-02-01T07:30:07+5:30
Nagpur News भाजप नेते माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली असून आपण त्याचा साक्षीदार आहोत, असा खळबळजनक आरोप बावनकुळे यांच्या पत्नीचे भाचे असलेल्या सुरज तातोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
नागपूर : भाजप नेते माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली असून आपण त्याचा साक्षीदार आहोत, असा खळबळजनक आरोप बावनकुळे यांच्या पत्नीचे भाचे असलेल्या सुरज तातोडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
सुरज तातोडे हे त्यांचे पत्नीचे भाचे आहेत. ऍड.सतीश उके यांनी त्यांना आज नागपुरात आणून पत्रकार परिषद घेतली. बावनकुळे ऊर्जामंत्री असताना सुरज तातोडे हे त्यांच्या नागपूर आणि मुंबईतील बंगल्यावर काम करायचे. कंत्राटदारांकडून मिळालेले भ्रष्टाचाराचे पैसे बावनकुळे सुरज तातोडे यांच्याकडे द्यायचे. दोन वर्षात अंदाजे 100 कोटी काळा पैसा बावनकुळे यांनी ठेवायला दिला, असा दावा तातोडे यांनी केला. एसजी इन्फ्रा, केकेसी, सरस्वती कन्ट्रक्शन या कंपन्याकडून बावनकुळे यांनी पैसे घेतले, असा आरोपही त्यांनी केलाय.
दरम्यान काळ्या पैशाच्या हिशोबात घोटाळा केल्याचा आरोप बावनकुळे यांनी तातोडे यांच्यावर केला. 30 लाख रुपये दिले नाही म्हणून त्यांना कामावरून काढून टाकले. त्यांच्या नावावर असलेले नागपुरातील पाच फ्लॅट, चार कार आणि एका कंपनीतील शेअर्स बावनकुळे यांनी जबरदस्तीने आपल्या नावावर केल्याचा आरोपही तातोडे यांनी केला. सततच्या धमक्या आणि टेन्शनमुळं तातोडे यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यातून ते बचावले, मात्र नैराश्याने ते खचले आणि शेवटी ऍड. उके यांच्याकडे आल्याचं त्यांनी सांगितलं.
ऍड. उके यांनी बावनकुळे हे आज पाच हजार कोटी रुपयांचे मालक आहेत. ज्या प्रमाणे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर आरोप झाले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन खटला चालविला जातोय त्याच पद्धतीने बावनकुळे यांच्या विरोधात साक्षीदार आरोप करतोय, त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल त्यांच्या चौकशी केली जावी, अशी मागणी केली.