बावनकुळेंचे तिकीट कापणे भाजपला भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:16 AM2019-10-25T01:16:08+5:302019-10-25T01:17:49+5:30

राज्याचे ऊर्जा तथा नागपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी कापल्याचा भारतीय जनता पक्षाला पूर्व विदर्भात जबर फटका बसल्याचे आजच्या निकालानंतर बोलले जात आहे.

Bawankulae ticket cut off, BJP paid the cost | बावनकुळेंचे तिकीट कापणे भाजपला भोवले

बावनकुळेंचे तिकीट कापणे भाजपला भोवले

Next
ठळक मुद्देपूर्व विदर्भात फटका : दिग्गजांनाही बसला धक्का

लोकमत वृत्तसेवा
नागपूर : राज्याचे ऊर्जा तथा नागपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी कापल्याचा भारतीय जनता पक्षाला पूर्व विदर्भात जबर फटका बसल्याचे आजच्या निकालानंतर बोलले जात आहे.
कामठी विधानसभा मतदार संघातून तीन वेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या बावनकुळेंना शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्याऐवजी किमान त्यांच्या पत्नीला तरी उमेदवारी मिळेल, या विश्वासाने ज्योती बावनकुळे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. परंतु उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांनाही लढविण्यास नकार दिला. ज्या पद्धतीने बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि शेवटच्या क्षणी त्यांच्या पत्नीलाही अपमानित करण्यात आले, या घटनेची संतप्त प्रतिक्रिया विदर्भातील तेली आणि बहुजन समाजात तीव्रतेने उमटली. त्याच वेळी भाजपला पूर्व विदर्भात बावनकुळे इफेक्टचा फटका बसेल, असे राजकीय जाणकार सांगत होते, त्याचे प्रत्यंतर आज आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बावनकुळे यांचा योग्य मान-सन्मान राखला जाईल, असे प्रत्येक प्रचारसभेत सांगितले. परंतु त्याचा मतदारांवर फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. नागपूर या त्यांच्या गृहजिल्ह्यात नागपूर शहरातील पश्चिम आणि उत्तर या दोन मतदार संघात तसेच जिल्ह्यातील काटोल, रामटेक, सावनेर आणि उमरेड या चार मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. बावनकुळेंच्या कामठी मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आला असला तरी त्याच्या विजयाचे श्रेय बावनकुळेंनी केलेल्या विकास कामांनाच जाते, असे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. बावनकुळेंनी पालकमंत्रीपद भूषविलेल्या भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि साकोली या तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पराभूत झाले. भंडारा-गोंदियाचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनाही तिथे धक्कादायक पराभव पत्करावा लागला. काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांना पराभूत करणे भाजप नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला होता. परंतु तिथेही बावनकुळे इफे क्ट असल्याचे समोर आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदार संघाचा अपवाद वगळता उर्वरित तिन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले. तिथेही हेच लोण पोहचले असल्याचे स्थानिक भाजप नेत्यांनी मान्य केले आहे. बावनकुळे सध्या पालकमंत्री असलेल्या वर्धा जिल्ह्यात चारपैकी तीन जागा भाजपच्या पदरात पडल्या, हे त्यांनी शेवटच्या क्षणी घेतलेले परिश्रम कामात आल्याचे वर्धा जिल्ह्यातील एका विजयी आमदाराने सांगितले.
उमेदवारी नाकारल्यानंतरही बावनकुळेंनी पक्षाचा प्रामाणिक प्रचार केला तरी मतदारांनी त्यांचे ऐकले नाही. उमेदवारी कापताना पक्षश्रेष्ठींनी लोकभावनेचा अदमास घेतला असता तर पक्षाला पूर्व विदर्भात असा दारुण पराभव स्वीकारावा लागला नसता. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी आत्मचिंतन करावे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

Web Title: Bawankulae ticket cut off, BJP paid the cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.