नागपुरात पेट्रोलपंप लुटणारा बावरी बाईकने पोहचला सुरतमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:27 PM2020-05-27T19:27:45+5:302020-05-27T22:13:46+5:30

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा खून केल्यानंतर एक लाख रुपये लुटणारा अट्टल गुन्हेगार सागर बावरी याने बाईकनेच नागपूर ते सुरत असा पल्ला गाठला. घटनेपासूनच त्याच्या पाळतीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला गुजरात-राजस्थान सीमेवरील पालनपूर येथे अटक केली आहे.

Bawri, who robbed a petrol pump, reached Surat by bike | नागपुरात पेट्रोलपंप लुटणारा बावरी बाईकने पोहचला सुरतमध्ये

नागपुरात पेट्रोलपंप लुटणारा बावरी बाईकने पोहचला सुरतमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देगुजरात-राजस्थान सीमेवर झाली अटक : अनेक प्रकरणात सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा खून केल्यानंतर एक लाख रुपये लुटणारा अट्टल गुन्हेगार सागर बावरी याने बाईकनेच नागपूर ते सुरत असा पल्ला गाठला. घटनेपासूनच त्याच्या पाळतीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला गुजरात-राजस्थान सीमेवरील पालनपूर येथे अटक केली आहे. जुगारात कंगाल झाल्यानंतर बावरीने पेट्रोलपंप लुटला व तेथील कर्मचाºयाची हत्या केली होती. तपासणीत त्याचा सहभाग असलेल्या अनेक गुन्हेगारी घटनांचा छडा लागण्याची शक्यता आहे.
वानाडोंगरी येथील हिंगणा-अमरावती आऊटर रिंग रोडवरील पेट्रोल पंपावर २१ मे रोजी बावरीने लूट केली होती. लुटीदरम्यान पंपावरील कर्मचारी पंढरी भांडारकर यांची हत्या केली आणि दुसरा कर्मचारी लीलाधर गोहते यांना गंभीर दुखापत केली होती. या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीनांसह पाच आरोपींना बेड्या टाकल्या. मात्र, लूट घेऊन बावरी पसार झाला. एमआयडीसी येथील असलेल्या बावरीच्या जुगार अड्ड्यावरच या लुटीची योजना आखण्यात आली होती आणि घटनेनंतर तो पुन्हा त्याच अड्ड्यावर गेल्याची माहिती ‘लोकमत’ने उजागर केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांमध्ये खळबळ माजली होती. त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलविण्यास सुरुवात केली. गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बावरी घटनेनंतर बाईकवर सुरत येथे पोहचला आणि तेथून ट्रकमध्ये बसून गुजरात व राजस्थान सीमेवर असलेल्या पालनपूर येथे पोहोचला. तेथून तो राजस्थानला जाण्याच्या तयारीत होता. दरम्यान, एमआयडीसी पोलीस सुरतला पोहचले. तेथे पालनपूरमध्ये एक गुन्हेगार लपून बसल्याची माहिती मिळताच पालनपूर पोलिसांच्या सहयोगाने बावरीला अटक करण्यात आली. बुधवारी संध्याकाळी त्याला घेऊन पोलीस नागपूरला पोहोचले. देशात टाळेबंदी आहे आणि लाखोंच्या संख्येने मजूरवर्ग पायी अथवा मिळेल त्या साधनाने आपल्या गंतव्य स्थळी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. याच मजुरांच्या आडोशाखाली बावरी बाईकने सुरतला पोहचला होता. विशेष म्हणजे याच बावरीने सुपारी घेऊन प्रा. मोरेश्वर वानखेडे यांची हत्या केली होती. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर आहे. बावरीचा गुन्हेगारी जगतात मोठा वावर असून, तो एमआयडीसी येथील काही जुगार अड्ड्याशीही जुळलेला होता. त्याच्या नावावर अनेक गंभीर घटनांची नोंद आहे.

बावरी मस्त, पोलीस भुकेने त्रस्त
एकीकडे बावरी प्रवासी मजुरांच्या आडोशाखाली पळून जाण्याच्या बेतात यशस्वी होत होता आणि त्याच्या मागावर असलेल्या एमआयडीसी पोलिसांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. नागपूर ते पालनपूर हे अंतर अकराशे किमी एवढे आहे शिवाय टाळेबंदीने कसलीच सुविधा नाही. त्यामुळे, पोलिसांना मार्गात भूक आणि तहानेचा सामना करावा लागला. मजुरांसाठी असलेल्या शिबिरात जेवण किंवा चहा-नाश्त्यावरच भूक भागवावी लागत होती. बावरीला अटक केल्यानंतर तर पोलिसांची जबाबदारी आणखीनच वाढली. त्यामुळे, नागपूरला पोहचेपर्यंत पोलिसांना डोळ्याची पापणीही हलवता येईना, अशी स्थिती होती.

Web Title: Bawri, who robbed a petrol pump, reached Surat by bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.