बीबीए, बीसीएच्या प्रवेशाची पुन्हा परीक्षा, पुन्हा संधी

By निशांत वानखेडे | Published: June 29, 2024 03:52 PM2024-06-29T15:52:49+5:302024-06-29T15:54:06+5:30

३ जुलैपर्यंत करा ऑनलाईन अर्ज : महाराष्ट्र सीईटी सेलने जाहीर केला कार्यक्रम

BBA, BCA admission re-examination, re-chance | बीबीए, बीसीएच्या प्रवेशाची पुन्हा परीक्षा, पुन्हा संधी

BBA, BCA admission re-examination, re-chance

नागपूर : बीबीए, बीसीए व तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी मिळणार आहे. महाराष्ट्र सीईटी सेलने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय केला असून २९ जून ते ३ जुलैपर्यंत प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

 

बीबीए व बीसीएच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून प्रवेश परीक्षा लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारने बीबीए व बीसीए अभ्यासक्रम तांत्रिक शिक्षणाच्या गटात अंतर्भूत करून ऑल इंडिया काैन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)च्या माध्यमातून या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा लागू केली. ही परीक्षा २९ मे राेजी घेण्यात आली हाेती. मात्र ऐन बारावीच्या परीक्षेच्या काळात हा कार्यक्रम जाहीर केल्याने बहुतेक विद्यार्थी या निर्णयापासून अनभिज्ञ राहिले. त्यामुळे बहुतेकांनी परीक्षाच दिली नव्हती व ८० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली हाेती. त्यामुळे महाविद्यालयांनी एकतर परीक्षाच रद्द करण्याची किंवा पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी सरकारला केली हाेती.

 

आता महाराष्ट्र सीईटी सेलने पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. २९ जून ते ३ जुलै या काळात ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमात सीईटी सेलच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारेच प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांनी २९ मे राेजी परीक्षा दिली त्यांनाही नव्याने परीक्षेला बसता येणार आहे. दाेनदा परीक्षा देणाऱ्यांना ज्या परीक्षेत सर्वाेत्तम पर्सेंटाईल असतील, त्याच्या आधारे प्रवेश मिळणार आहेत.

 

राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ४ जिल्ह्यांत जवळपास २५० महाविद्यालयांमध्ये बीबीए, बीसीएच्या ३५ ते ४० हजार जागा असण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यातही अडीच लाख जागा आहेत. यातील ८० टक्के जागा रिक्त राहण्याची भीती हाेती. मात्र नव्याने परीक्षा हाेत असल्याने महाविद्यालयांना दिलासा मिळाल्याचे जे. डी. काॅलेजचे कार्यकारी संचालक अविनाश दाेरसटवार म्हणाले.

 

किती महाविद्यालयांनीही घेतली मान्यता?
बीबीए, बीसीएचे अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांना एआयसीटीईकडून मान्यता घेणे आवश्यक हाेते. मात्र ५० ते ६० टक्के महाविद्यालयांनीही ती घेतली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना नव्याने मान्यता घेण्याची संधी मिळेल, याबाबत संभ्रम आहे.

Web Title: BBA, BCA admission re-examination, re-chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.