‘बीसीसीए’ प्रश्नपत्रिका प्रकरणात चौकशी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:39 PM2018-04-17T23:39:33+5:302018-04-17T23:39:43+5:30
‘बीसीसीए’च्या प्रथम सत्र अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेत १० ऐवजी ९ प्रश्नच छापून येण्याचा मुद्दा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने गंभीरतेने घेतला आहे. हे प्रकरण प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सोपविण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी ‘बीकॉम’मधील त्रुटींसोबतच यासंदर्भातदेखील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘बीसीसीए’च्या प्रथम सत्र अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेत १० ऐवजी ९ प्रश्नच छापून येण्याचा मुद्दा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने गंभीरतेने घेतला आहे. हे प्रकरण प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सोपविण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी ‘बीकॉम’मधील त्रुटींसोबतच यासंदर्भातदेखील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोमवारी ‘बीसीसीए’चा प्रथम सत्राचा ‘फंडामेंटल कॉम्प्युटर’ या विषयाचा पेपर होता. यात प्रश्नपत्रिकेत १० प्रश्न असणे अनिवार्य होते. मात्र प्रत्यक्षात प्रश्नपत्रिकेमध्ये ९ प्रश्नच छापून आले होते. प्रश्न क्र.१ जी मध्ये प्रश्नच नव्हता. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी काही परीक्षा केंद्रांवर गोंधळदेखील घातला.
यासंदर्भात विद्यापीठाने समिती स्थापन केली असून, १९ तारखेला याबाबत चर्चा होईल. विद्यार्थ्यांना या प्रश्नाऐवजी गुण देण्यात यायचे की नाही, हे ठरविण्यात येईल. तसेच पेपर ‘सेट’ करणाऱ्या प्राध्यापकाविरोधातदेखील कारवाईबाबत विचार करण्यात येईल. हा अहवाल कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना सोपविण्यात येईल.
अभ्यास मंडळ अध्यक्ष म्हणतात, चूक नाही
‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर कुलगुरूंनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विनायक देशपांडे यांना संबंधित मंडळाच्या अध्यक्षांना विचारणा करण्याची सूचना केली. परंतु संबंधित अध्यक्ष डॉ. लांजेवार यांनी मात्र काहीच चूक नसल्याच दावा केला.