‘बीसीसीए’ऐवजी मिळाला ‘बीकॉम’चा पेपर

By admin | Published: November 3, 2015 03:22 AM2015-11-03T03:22:48+5:302015-11-03T03:22:48+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांत कुठल्याही त्रुटी राहू नयेत यासाठी परीक्षा विभागाकडून

BCcom's paper instead of 'BCom' | ‘बीसीसीए’ऐवजी मिळाला ‘बीकॉम’चा पेपर

‘बीसीसीए’ऐवजी मिळाला ‘बीकॉम’चा पेपर

Next

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांत कुठल्याही त्रुटी राहू नयेत यासाठी परीक्षा विभागाकडून कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु सुरळीत चाललेल्या हिवाळी परीक्षेला धक्का देणारी बाब सोमवारी घडली आहे.
नागपुरातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना ‘बीसीसीए’ऐवजी चक्क ‘बीकॉम’चा पेपर देण्यात आला; शिवाय हाच पेपर तुम्हाला सोडवायचा आहे, असे सांगण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडे रात्री उशिरापर्यंत कुठलीही माहिती पोहोचली नव्हती.
नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुरू आहेत. सोमवारी धरमपेठ एम.पी. देव विज्ञान महाविद्यालयात ‘बीसीसीए’ भाग २ चा पेपर दुपारी २ ते ५ या कालावधीत होता. विद्यार्थी येथे वेळेवर पोहोचले. परंतु त्यांना नोटीस बोर्डवरच आश्चर्याचा धक्का बसला. ‘बीसीसीए’च्या बैठक क्रमांक तक्त्यामध्ये लिहिण्यातच आले नव्हते. या केंद्रावर ‘बीबीए भाग १’, ‘बीकॉम भाग २’ या अभ्यासक्रमांचे देखील पेपर होते. सर्व अभ्यासक्रमांचा ‘कॉस्ट अ‍ॅन्ड मॅनेजमेंट अकाऊंटिंग’ या विषयाचाच पेपर होता.
परीक्षा केंद्रावर मिळालेल्या सूचनेनंतर ‘बीसीसीए’चे विद्यार्थी आपापल्या बैठक क्रमांकावर जाऊन बसले. परंतु प्रश्नपत्रिका हाती येताच ते अक्षरश: हादरले. त्यांना ‘बीसीसीए’ऐवजी ‘बीकॉम’ची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात पर्यवेक्षकांना माहिती दिली. परंतु विद्यापीठाकडून याच प्रश्नपत्रिका आल्या असून यांनाच तुम्हाला सोडवावे लागेल, असे उत्तर मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. सारख्याच विषयाचा पेपर असल्यामुळे काही प्रश्नांची उत्तरे येत होती व त्यामुळे नाईलाजाने जितके येईल तितका पेपर सोडविला, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. यातील बहुतांश विद्यार्थी हे एकाच महाविद्यालयातील होते. दुसऱ्या वर्गखोलीतील काही विद्यार्थ्यांनी पेपरच न लिहिण्याचा पवित्रा घेतला. त्यांना लगेच प्रश्नपत्रिका बदलवून देण्यात आल्या, असेदेखील विद्यार्थ्यांनी सांगितले. पेपर उशिरा संपल्यामुळे विद्यापीठात तक्रार देता आली नसल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. (प्रतिनिधी)

कुठलीही तक्रार नाही : प्र-कुलगुरू
यासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी संपर्क साधला असता अशी कुठलीही अधिकृत तक्रार आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांसोबत मी परीक्षा विभागातच होतो. परीक्षा केंद्रावरूनदेखील यासंदर्भात कुठलीही सूचना आली नाही. जर खरोखरच असा प्रकार झाला असेल तर गंभीर आहे. परंतु अधिकृत तक्रार येईपर्यंत यावर कुठलेही भाष्य करणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले.

Web Title: BCcom's paper instead of 'BCom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.