"उद्यान मित्र व्हा! निसर्ग संवर्धनात आपली भूमिका बजावा", महापालिकेचे नागरिकांना आवाहन
By मंगेश व्यवहारे | Published: June 22, 2024 03:39 PM2024-06-22T15:39:57+5:302024-06-22T15:40:11+5:30
महापालिका उद्यानांच्या विकास आणि देखभाल दुरूस्तीकडे लक्ष ठेवण्यासाठी ‘उद्यान मित्र’ हा उपक्रम राबवित आहे.
नागपूर : “उद्यान मित्र व्हा!” आणि निसर्ग संवर्धनात आपली भूमिका बजावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. महापालिका उद्यानांच्या विकास आणि देखभाल दुरूस्तीकडे लक्ष ठेवण्यासाठी ‘उद्यान मित्र’ हा उपक्रम राबवित आहे.
शहरातील लहान मोठी उद्याने असून, या उद्यानाच्या चांगल्या प्रकारे देखभाली व संचालनाच्या कामामध्ये नागरिकांचा सहभाग राहण्याकरिता महानगरपालिकेल्या उद्यान विभागाद्वारे "उद्यान मित्र" नेमणूक करण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांकरिता एक संकेतस्थळ देण्यात आले आहे. त्यावर नोंदणी फॉर्म उपलब्ध आहे. करिता नागरिकांनी १५ दिवसाचा आत ऑलाईन फॉर्म भरावा असे आवाहनही उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.
शहरात मोठी २६, मध्यम व लहान १५६ उद्याने आहेत. या उद्यानांमधील सुविधा व्यवस्थिती कार्यरत आहेत अथवा नाही याची पाहणी करून वेळेवर आवश्यक दुरूस्त्या सूचविणे व उद्यानांतील व्यवस्थेकडे लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांमधूनच उद्यान मित्र नेमण्यात येणार आहेत.
उद्यानांची दैनंदिन साफसफाई पाहणे, हिरवळीच्या कामावर देखभाल व निगराणी ठेवणे, ग्रीन जीमची देखभाल आणि दुरूस्ती पाहणे, लहान मुलांच्या खेळण्यांची देखभाल आणि दुरूस्ती पाहणे, उद्यानाच्या विकासाची कामे सुचविणे, उद्यानातील कारंजे, स्थापत्य इतर कामांची पाहणी करणे, मनपाद्वारे बोलविण्यात येणाऱ्या मासिक बैठकीत सहभागी होणे व मनपाकडून वेळोवेळी मागविण्यात येणारे अभिप्राय नोंदविणे आदी स्वरुपाचे काम उद्यान मित्राचे राहणार आहे.
- उद्यान मित्रांकरीता निवडीचे निकष
१) उद्यान मित्राचे वय २५ ते ८० वर्षापर्यंत असावे.
२) एका उद्यानाकरीता एकापेक्षा अधिक उद्यान मित्रांची निवड करता येईल.
३) उद्यान मित्र शक्यतोवर उद्यानाच्या (२ किमी) परिसरातील रहिवासी असावा.
४) उद्यान मित्रावर गुन्हे दाखल नसावेत (मनपा नागपूर कडून पोलिस व्हेरिफिकेशन करण्यात येईल.)
५) सामाजिक कार्य किंवा उद्यान शास्त्राचा अनुभव असलेल्यास प्राधान्य देण्यात येईल.
६) उद्यान मित्राचे कार्यक्षेत्र हे उद्यान देखरेख, स्वच्छता पर्यावरणाशी संबंधीत क्षेत्रात जनजागृती, वृक्ष लागवड, जतन आदी संबधीत महानगरपालिकेला अभिप्राय, सुचना देणे क्षेत्रांशी मर्यादीत राहील.
७) उद्यान मित्राला ओळखपत्र देण्यात येईल व त्याची वैधता कमाल तीन वर्षापर्यंत राहील.