‘फेक न्यूज’ पसरवताय..सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:44 AM2019-11-29T10:44:06+5:302019-11-29T10:46:45+5:30

‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात प्रसारमाध्यमेदेखील ‘ई’ चावडीवर सहजपणे उपलब्ध होतात. परंतु अनेकदा कुठलीही शहानिशा न करता नागरिकांकडून ‘फेक न्यूज’ एकमेकांना पाठविण्यात येतात.

Be aware, Are you going to spread 'Fake News'? | ‘फेक न्यूज’ पसरवताय..सावधान!

‘फेक न्यूज’ पसरवताय..सावधान!

Next
ठळक मुद्देचार वर्षांत १२ गुन्हे दाखलकारवाईचे प्रमाण कधी वाढणार ?

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात प्रसारमाध्यमेदेखील ‘ई’ चावडीवर सहजपणे उपलब्ध होतात. परंतु अनेकदा कुठलीही शहानिशा न करता नागरिकांकडून ‘फेक न्यूज’ एकमेकांना पाठविण्यात येतात. मात्र असे करणे महागात पडू शकते. २०१६ पासून नागपूर शहरात अशा प्रकारे ‘फेक न्यूज’ विविध ‘सोशल मीडिया’वर ‘पोस्ट’ करणे अनेकांना महाग पडले. ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार चार वर्षांत १२ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ‘फेक न्यूज’चे एकूण प्रमाण लक्षात घेता गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी असून कारवाईचे प्रमाण कधी वाढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील काही वर्षांत ‘स्मार्टफोन्स’ वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे ‘वेबपोर्टल्स’ असून त्यावर नियमितपणे बातम्या ‘अपडेट’ होतात. परंतु अनेकदा ही वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांचे नावाखाली खोटे वृत्त तयार केले जाते व ते ‘सोशल मीडिया’वर पसरविले जाते. याचप्रमाणे अनामिक म्हणूनदेखील अनेकदा खोटे वृत्त विविध ‘प्लॅटफॉर्म्स’वर ‘पोस्ट’ करण्यात येते. एखाद्या परिचिताने पाठविले म्हणून ते इतरांकडूनदेखील समोर ‘फॉरवर्ड’ होते.
असे प्रकार दररोज घडत असतात. परंतु असे करणे हा प्रकार ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये येतो. असे करणाऱ्यांविरोधात ‘आयटी अ‍ॅक्ट’मधील कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो. २०१६ सालापासून नागपुरात ‘फेक न्यूज’संदर्भात विविध तक्रारी झाल्या व नागपूर पोलिसांनी एकूण १२ प्रकरणात गुन्हे दाखल केले. २०१६ मध्ये ४, २०१७ मध्ये २, व २०१८ साली तीन व २०१९ मध्ये आॅगस्ट महिन्यापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले.

‘फेक प्रोफाईल’विरोधात कठोर पावले हवी
‘सोशल मीडिया’वर ‘फेक प्रोफाईल’ तयार करून इतरांना त्रास देणे किंवा अश्लाघ्य भाषेत टीकाटिप्पणी करणे असे प्रकारदेखील होत असतात. राज्यातच अशा प्रकारच्या हजारो ‘फेक प्रोफाईल’ असतील. हादेखील ‘आयटी अ‍ॅक्ट’चा भंगच आहे. मात्र यासंदर्भात हवी तशी कारवाई होताना दिसून येत नाही. २०१७ साली राज्यभरात ‘फेक प्रोफाईल’ तयार करणाºया केवळ चार जणांविरोधातच गुन्हे दाखल झाले.

तक्रारीसाठी लोकच पुढे येत नाहीत
दररोज विविध ‘प्लॅटफॉर्म’वर ‘फेक न्यूज’ दिसून येतात. यातील काही बातम्या या सामाजिक सौहार्द बिघडविणाºया किंवा समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यादेखील असू शकतात. यासंदर्भात तक्रारीसाठी लोक पुढे येत नाही. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

‘एनसीआरबी’च्या अहवालात प्रथमच नोंद
‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) अहवालातदेखील ‘फेक न्यूज’ प्रकरणी दाखल गुन्ह्यांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारची नोंद प्रथमच दिसून येत आहे. २०१७ सालच्या अहवालानुसार महाराष्ट्रात असे उपद्व्याप करणाºया ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात नागपुरातील दोन गुन्ह्यांचा समावेश होता.

Web Title: Be aware, Are you going to spread 'Fake News'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.