देशासाठीच्या कर्तव्याची जाण ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 11:01 AM2020-12-01T11:01:38+5:302020-12-01T11:02:15+5:30
Nagpur News नागरिक सर्वसाधारणतः स्वतःच्या मूलभूत अधिकारांबाबत बोलताना दिसतात. मात्र कर्तव्याबाबत फारसे कुणी भाष्य करीत नाही. प्रत्येकाने देशासाठीच्या कर्तव्याची जाण ठेवली पाहिजे, असे मत अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर – नागरिक सर्वसाधारणतः स्वतःच्या मूलभूत अधिकारांबाबत बोलताना दिसतात. मात्र कर्तव्याबाबत फारसे कुणी भाष्य करीत नाही. प्रत्येकाने देशासाठीच्या कर्तव्याची जाण ठेवली पाहिजे, असे मत अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी व्यक्त केले. भारतीय विचार मंचतर्फे सदर येथे आयोजित संविधान दिवस कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
यावेळी अधिवक्ता ओमप्रकाश जैन, भारतीय विचार मंचचे सदर भाग संयोजक संजय करमरकर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात संविधानाची मूल्ये जपणारा व ती आचरणारा समाज अपेक्षित होता. त्याचे पालन करीत सर्व समाजाने एकमेकांशी सद्भावनेने वागावे, असे आवाहन मिर्झा यांनी केले. आपल्या मूलभूत अधिकारांबाबत बोलत असताना दुसऱ्याच्या अधिकारांना धक्का पोहोचता कामा नये. सर्वांचा आदर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन जैन यांनी केले. काही लोक जाणूनबुजून संविधानाच्या नावाखाली समाजात खोट्या व भ्रमित करणाऱ्या बाबी पसरवीत आहेत. अराजकता माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे, असे मत करमरकर यांनी व्यक्त केले. अनुज पाटील यांनी संचालन केले. भगवान दास अडवाणी, दिलीप मसराम, गणेश दास यावेळी उपस्थित होते.