सावधान! फेसबुक हॅक हाेण्याचे प्रमाण वाढले; पासवर्ड सतत बदलता ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 07:10 AM2021-11-10T07:10:00+5:302021-11-10T07:10:02+5:30
Nagpur News आता फेसबुक वापरताना प्रचंड काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्याचे आवाहन सायबर सेल पाेलिसांकडून केले जात आहे.
नागपूर : ऑनलाइन गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालले आहे. अशात भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून लाेकप्रिय समाजमाध्यम असलेले फेसबुक हॅक हाेण्याचे प्रमाणही वाढले आहे. फेसबुकमधून तुमची माहिती जमा करून त्याद्वारे आर्थिक लूट करण्याचे प्रयत्न केले जातात. याशिवाय तुमच्या काैटुंबिक फाेटाेंचा गैरवापर करण्याचा धाेकाही वाढला आहे. त्यामुळे आता फेसबुक वापरताना प्रचंड काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्याचे आवाहन सायबर सेल पाेलिसांकडून केले जात आहे.
टू स्टेप्स व्हेरिफिकेशन केले का?
आपली फसवणूक हाेण्यापासून वाचण्यासाठी सुरक्षितता बाळगणे महत्त्वाचे आहे. फेसबुकवर आपण वैयक्तिक, काैटुंबिक गाेष्टींसह बहुतेक खासगी गाेष्टी शेअर करीत असताे. हा डेटा अनाेळखी व्यक्ती किंवा हॅकर्सकडून उघडला आणि चाेरला जाऊ नये म्हणून टू स्टेप्स व्हेरिफिकेशन किंवा ‘टू फॅक्टर ऑथेंटिकेशन’ करणे गरजेचे आहे. ही सुरक्षित प्रक्रिया आहे ज्यामध्ये वापरकर्ते स्वतःची पडताळणी करण्यासाठी दोन भिन्न प्रमाणीकरण घटक किंवा दाेन ‘लाॅगिन काेड’ प्रदान करतात. त्यामुळे हॅकर्सनी एक लाॅगिन उघडले तरी दुसरे उघडणे शक्य नसते.
हॅकिंग टाळण्यासाठी हे करा
- हॅकिंग टाळण्यासाठी आपली माहिती असलेली फेसबुक प्राेफाइल नेहमी लाॅक करून ठेवा. ज्यामुळे कुणालाही माहिती काढता येणार नाही.
- तुमचा लाॅगिन पासवर्ड सतत बदलत राहा.
- त्याशिवाय फोन सतत अपडेट करा. म्हणजे त्यातील कार्यक्रम तुम्हाला सतत समजत राहतील.
- फोनला पासवर्ड ठेवा. त्यामुळे दुसरा कोणीही तुमच्या फोनचा वापर करू शकणार नाही.
- फेसबुकवर अनाेळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारू नका. अनोळखी मेसेज अथवा लिंक पाठवली गेली असेल, तर ती उघडू नका.
सायबर सेल अधिकाऱ्याचा कोट
सध्या ऑनलाइन गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सायबर गुन्हेगार तुमची आर्थिक लूट किंवा सामाजिक बदनामी करू शकतात. त्यामुळे या काळात साेशल मीडियाचा वापर करताना प्रचंड सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे पाेलिसांच्या सायबर सेल अधिकाऱ्यांनी सांगितले. एकतर कुणालाच ओटीपी सांगू नका, फेसबुकवर खासगी गाेष्टी, वैयक्तिक किंवा काैटुंबिक फाेटाे शेअर करू नका. अनाेळखी फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारू नका आणि सुरक्षेशी संबंधित गाेष्टींचे पालन करा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.