अयोध्येत हॉटेल अथवा धर्मशाळेचा ऑनलाईन पत्ता शोधत असाल तर सावधान

By नरेश डोंगरे | Published: March 3, 2024 04:08 PM2024-03-03T16:08:30+5:302024-03-03T16:09:15+5:30

एकाचवेळी हजारो जण अयोध्येत दाखल होत असल्याने तेथील धर्मशाळा, हॉटेल, लॉजमध्येही मोठी गर्दी होऊ लागली आहे.

Be careful if you are looking for online address of hotel or Dharamshala in Ayodhya | अयोध्येत हॉटेल अथवा धर्मशाळेचा ऑनलाईन पत्ता शोधत असाल तर सावधान

अयोध्येत हॉटेल अथवा धर्मशाळेचा ऑनलाईन पत्ता शोधत असाल तर सावधान

नागपूर : दूर कुठेतरी बसून तुमच्या घामाच्या कमाईवर तिरपी नजर लावून बसणारे सायबर गुन्हेगार कसे तुम्हाला फशी पाडतील आणि कसा आपला डाव साधतील, याचा नेम नाही. अवघ्या जगभरावर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या या ठगबाजांनी आता अयोध्येकडे नजर रोखली आहे. होय, ते आता अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या खिशावर हात साफ करीत आहेत. त्यामुळे तुम्ही अयोध्येला जाण्याच्या आणि तेथे मुक्कामासाठी कुण्या हॉटेल अथवा धर्मशाळेचा ऑनलाईन पत्ता शोधत असाल तर सावधान.

बहुचर्चित, बहुप्रतिक्षित अयोध्येतील भव्य दिव्य राममंदीरात २२ जानेवारीला प्रभू श्रीरामलल्लांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली आणि हे मंदीर दर्शनासाठी सर्वांना खुले झाले. तेव्हापासून जगभरातील रामभक्त अयोध्येत गर्दी करू लागले आहे. कधी एकदाचे अयोध्येत जातो आणि कधी रामलल्लाचे दर्शन घेतो, अशी अनेकांची स्थिती झाल्याने मिळेल त्या वाहनाने भाविक अयोध्येकडे जात आहेत. एकाचवेळी हजारो जण अयोध्येत दाखल होत असल्याने तेथील धर्मशाळा, हॉटेल, लॉजमध्येही मोठी गर्दी होऊ लागली आहे.

परिणामी अयोध्येत जायचे असेल तर गैरसोय टाळण्यासाठी आधी राहण्याची व्यवस्था करा, नंतरच तेथे जा, असे प्रत्येक भाविक एक दुसऱ्याला सांगतो आहे. त्यामुळे अनेकजण अयोध्येत दर्शनाला जाण्यापूर्वी तेथे मुक्कामाचे पर्याय शोधत आहेत. कुणी लॉज, कुणी हॉटेल तर कुणी धर्मशाळेची ऑनलाईन पाहणी करीत आहेत. नेमकी हीच बाब सायबर गुन्हेगारांच्या पथ्यावर पडली आहे. त्यांनी आता ऑनलाईन बुकिंगवर आपले जाळे पसरवले आहे. हॉटेल, लॉज, धर्मशाळेचा पर्याय शोधणारांशी ते संपर्क साधत आहेत आणि त्यांना आर्थिक गंडा घालत आहेत. अशा प्रकारे फसवणूक केल्याच्या अनेक घटना आता उघड होऊ लागल्या आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, मित्रांचा समूह असलेल्या रामभक्तांचा एक जत्था अयोध्येला जाण्याच्या तयारीत आहे. त्यांच्यातील एकाने मुक्कामासाठी अयोध्येतील हॉटेल, लॉज आणि धर्मशाळा शोधण्यासाठी ऑनलाईन पाहणी केली. त्यांना बिर्ला धर्मशाळेचा संपर्क क्रमांक मिळाला. संपर्क केला असता तेथून एका पंकज नामक व्यक्तीने सर्वांच्या राहण्यासाठी ३० हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगून बुकिंगसाठी १० हजार रुपयांची मागणी केली. ती रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा धर्मशाळेत येणारांची गर्दी खूप वाढली असून, तुमची बुकिंग पक्की करायची असेल तर पुन्हा ५ हजार रुपये मागितले. ते पाठविल्यानंतर पंकजने त्यांना पुन्हा ५ हजार पाठविण्यास सांगितले. त्यामुळे भाविकांना शंका आली. त्यांनी अयोध्येतील अन्य संपर्क शोधत शहानिशा केली असता धर्मशाळेच्या बुकिंगच्या नावाखाली कथित पंकज नामक ठगबाजाने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले

सव्वा महिन्यात पन्नास तक्रारी
सायबर गुन्हेगार अयोध्येतील वेगवेगळ्या हॉटेल आणि धर्मशाळेच्या नावाने बनावट वेबसाईट तयार करून त्यावर आपला संपर्क क्रमांक अपलोड करतात. त्यावर भाविकांनी संपर्क करताच त्यांना पद्धतशिरपणे फसवणूक करतात. गेल्या सव्वा महिन्यात अशा प्रकारे पन्नासावर फसवणूकीच्या घटना घडल्याचे सांगितले जाते.

Web Title: Be careful if you are looking for online address of hotel or Dharamshala in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.