सावधान! नागपुरात तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोनाचे २५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 08:37 PM2022-06-07T20:37:02+5:302022-06-07T20:38:20+5:30
Nagpur News गेल्या २४ तासामध्ये नागपूर जिल्ह्यात २५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत वाढ झाल्याने प्रशासन ‘अलर्ट’वर आले आहे.
नागपूर : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आठवडाभरात कोरोना रुग्णात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या २४ तासामध्ये नागपूर जिल्ह्यात २५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत वाढ झाल्याने प्रशासन ‘अलर्ट’वर आले आहे.
नागपूर जिल्ह्यात तिसरी लाट फेब्रुवारीमध्ये ओसरली. ४ मार्च रोजी २८ रुग्णांची नोंद झाल्यानंतर रुग्णसंख्या १० वर गेली नव्हती. परंतु १ जूनपासून रुग्णसंख्येत वाढ होत असताना दिसून येत आहे. मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १५, ग्रामीणमधील ७, तर जिल्हा बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे, १९ मार्चनंतर मृत्यूची नोंद नाही. रुग्णांची एकूण संख्या ५,७७,९०२ झाली असून, मृतांची संख्या १०,३३८ वर स्थिर आहे.
धरमपेठ, मंगळवारी झोनमधील रुग्ण
शहरात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मनपाच्या धरमपेठ झोनमधील ३ तर मंगळवारी झोनमधील ६ रुग्ण आहेत. इतर रुग्ण हे लक्ष्मीनगर, हनुमाननगर व सतरंजीपुरा येथील आहेत.
कुणालाच लक्षणे नाहीत
शहरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कुणालाच लक्षणे नाहीत. विमानतळावर चाचणी केल्यावर त्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांची दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी आहे. या सर्वांना घरी थांबूनच उपचार घेण्याचा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
कोरोनाचे ५३ रुग्ण ॲक्टिव्ह
१९ एप्रिल रोजी कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ १ होती. त्यानंतर ती शून्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, यात वाढच होत गेली. मंगळवारी शहरात ३४, ग्रामीणमध्ये १८ तर जिल्हाबाहेरील १ असे एकूण ५३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. विशेष म्हणजे, सर्व रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
-रोज ५०० वर चाचण्या
मार्च महिन्यात रोज हजारावर होत असलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या एप्रिल महिन्यात अर्ध्यावर आली. मे महिन्यात ४०० ते ५०० दरम्यान होत असताना मंगळवारी हा आकडा ५८७ वर गेला. चाचण्यांच्या तुलनेत ४.२५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्य शासनाने सोमवारीच आरोग्य विभागांना चाचण्या वाढविण्याचा सूचना दिल्या आहेत.