सावधान! आजही नागपुरात चोरीछुपे विकला जातो आहे नायलॉन मांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:28 AM2018-01-10T11:28:54+5:302018-01-10T11:31:35+5:30

‘नायलॉन’ मांजा यंदा बाजारात विक्रीला उपलब्ध नाही, असा दावा दुकानदार व प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात हा दावा अतिशय पोकळ असून, शहरातील अनेक भागांमध्ये चोरीछुपे या जीवघेण्या ‘चायनीज’ मांजाची विक्री सुरूच आहे.

Be careful! Nilon Manza is still selling in Nagpur | सावधान! आजही नागपुरात चोरीछुपे विकला जातो आहे नायलॉन मांजा

सावधान! आजही नागपुरात चोरीछुपे विकला जातो आहे नायलॉन मांजा

Next
ठळक मुद्देप्रशासनाची कुंभकर्णी झोप‘चायनीज’ मांजावरील बंदी नावापुरतीच

योगेश पांडे/सुमेध वाघमारे
नागपूर : आतापर्यंत अनेकांचे जीव घेणारा, शेकडो जणांना जखमी करणारा व असंख्य पक्ष्यांसाठी काळ ठरलेला ‘नायलॉन’ मांजा यंदा बाजारात विक्रीला उपलब्ध नाही, असा दावा दुकानदार व प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात हा दावा अतिशय पोकळ असून, शहरातील अनेक भागांमध्ये चोरीछुपे या जीवघेण्या ‘चायनीज’ मांजाची विक्री सुरूच आहे. सहजपणे न तुटणारा ‘नायलॉन’चा मांजा व काचेचा चुरा लावलेल्या मांजाच्या विक्रीवर बंदी घातली असतानादेखील अव्वाच्यासव्वा दरात याची विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, हा मांजा विकताना दुकानदार ग्राहकांची अगोदर चाचपणी करीत आहेत. मात्र दुसरीकडे शाळकरी मुलांना हा मांजा सहजपणे उपलब्ध करून दिला जात आहे. ‘लोकमत’ चमूने आज शहरातील विविध पतंग बाजार व दुकानांमध्ये जाऊन पाहणी केली असता, हे भयानक वास्तव समोर आले.

अगोदर नकार, मग होकार
पतंग व मांजाचा सर्वात मोठा बाजार जुनी शुक्रवारी, सक्करदरा येथे भरतो. मंगळवारी दुपारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने येथे जाऊन ‘नायलॉन’ मांजाची विचारणा केली असता, अगोदर सर्वच दुकानदारांनी ‘आम्ही हा मांजा विकत नाही’ असे सांगितले तसेच फलकदेखील त्यांनी लावले आहे. मात्र काही वेळाने हातात पतंग आणि चक्री घेऊन जेव्हा दुकानात विचारणा केली तेव्हा काही ठिकाणी होकारात्मक प्रतिसाद मिळाला. ‘नेमक्या कुठल्या ‘ब्रॅन्ड’चा मांजा पाहिजे व कधी हवा, असे विचारण्यात आले. दिवसाढवळ्या उघडपणे आम्ही मांजा विकू शकत नाही, मात्र आमच्याकडे ‘स्टॉक’ आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

बाजारात दोन प्रकार उपलब्ध
‘लोकमत’ चमूने नागपुरात विविध ठिकाणी पाहणी केल्यानंतर ‘नायलॉन’ मांजाचे प्रामुख्याने दोन प्रकार उपलब्ध असल्याची माहिती समोर आली. ‘आयबी’ आणि ‘मोनोकाईट’ असे मांजाचे दोन प्रकार आहेत. यातील ‘आयबी’ची एक ‘रिळ’ जास्त विकल्या जात आहे. ‘मोनोकाईट’ची किंमत दुपटीहून अधिक असून, हा आकडा ९०० ते १५०० रुपयांच्या घरात आहे.


शाळकरी मुलांना सहज मिळतोय मांजा
आश्चर्याची बाब म्हणजे तरुणांना ‘नायलॉन’ मांजा देण्यास नकार देत असताना दुकानदार शाळकरी मुलांना सहजपणे याची विक्री करीत आहेत. इतवारीत ‘लोकमत’ प्रतिनिधी विचारणा करीत असताना दोन शाळकरी मुलेदेखील तिथे आली. त्यांना विक्रेत्याने कुठलेही आढेवेढे न घेता ५० रुपये जास्त घेऊन ‘नायलॉन’ची ‘रिळ’ सोपविली.

पाच दिवसांपूर्वीच संपला मांजा
सक्करदरा परिसरातील एका मांजा विक्रेत्याकडे ‘नायलॉन’ मांजाची मागणी केली असता त्याने पाच दिवसांपूर्वीच हा मांजा संपल्याचे सांगून त्यासारखाचा मांजा असलेला १२ तार घेऊन जाण्याचा आग्रह केला. दुकानदाराने आता कुठेच ‘नायलॉन’ मांजा मिळणार नाही, जी खरेदी-विक्री व्हायची होती ती आधीच झाल्याची पुष्टीही त्याने केली.

ग्राहकांची चाचपणी, मगच ‘नायलॉन’ची विक्री
पतंग बाजारात ‘नायलॉन’ मांजा विक्रीसाठी उपलब्ध असला तरी अनोळखी व्यक्तीला हा मांजा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. ‘लोकमत’चमूने या मांजाची मागणी केली असता अनेक विक्रेत्यांनी ‘नायलॉन’ मांजाच्या विक्रीला बंदी असल्याचे सांगितले. मात्र ज्यावेळी सराईत पतंगबाजाप्रमाणे विचारणा केली तेव्हा मात्र माहिती मिळत गेली.

गल्लीबोळांतदेखील विक्री
उमरेड मार्गावरील पंचवटी वृद्धाश्रमासमोरील वस्तीमध्ये ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता तेथे तर गल्लीबोळात ‘नायलॉन’ मांजा अगदी सहजपणे उपलब्ध होता. कुठलेही आढेवेढे न घेता येथील विक्रेत्याने ‘नायलॉन’ देण्याची तयारी दाखविली.

दोन दिवसांनी नक्की मिळेल मांजा
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने टिमकी मार्गावरील बाजारात विचारणा केली तेव्हा अगोदर नकारच मिळाला. मात्र फार आग्रह केल्यानंतर सध्या ‘स्टॉक’ उपलब्ध नाही. मात्र आम्ही ‘नायलॉन’ मांजा मागवून देऊ. त्यासाठी दोन दिवसांची प्रतीक्षा करा, असे उत्तर विक्रेत्याकडून मिळाले.

हा मांजा जीवघेणाच
कोंबडीसारखे गळे कापले जावे, असे तीक्ष्ण स्वरूपाच्या मांजाने आतापर्यंत अनेक दुचाकीस्वारांचा क्षणात कचकन गळा कापला गेला आहे. अनेक गंभीर जखमी झाले तर काहींचा जीवही गेला आहे. पतंगीच्या हुल्लडबाजीत ‘सुरे’ ठरू पाहणाऱ्या या मांजावर गेल्या वर्षीपासून बंदी आणली आहे. परंतु या बंदीतही मांजाच्या विक्रीत फरक पडलेला नाही. काही ठिकाणी दिवसा विक्रीवर बंदी दाखवून रात्री विक्री होत असल्याचे तर काही ठिकाणी दिवसा केवळ ओळखीच्या व नेहमीच्या ग्राहकांनाच हा मांजा उपलब्ध करून दिला जात आहे.

 

Web Title: Be careful! Nilon Manza is still selling in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.