सावधान, दहन घाटावरच फेकल्या जाताहेत पीपीई कीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 01:55 AM2020-09-03T01:55:23+5:302020-09-03T01:59:28+5:30
मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यसंस्कारावेळी वापरल्या जाणारे सुरक्षित वैद्यकीय वस्त्र (पीपीई कीट) वापरानंतर दहन घाटावरच फेकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यसंस्कारावेळी वापरल्या जाणारे सुरक्षित वैद्यकीय वस्त्र (पीपीई कीट) वापरानंतर दहन घाटावरच फेकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे दहन घाट कोरोनाच्या प्रसाराचे केंद्र ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागपुरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत असून मृतांची संख्याही प्रचंड वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु नागरिकांकडूनही बेजबाबदारपणामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास हातभार लागत आहे. याचे उत्तम उदाहरण अंबाझरी घाटावर मंगळवारी पाहायला मिळाले.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला तर त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत. जसे मृतदेह हा रुग्णालयातून थेट घाटावरच आणला जातो. रुग्णांच्या नातेवाईकांनामृताची ओळक करून दिल्यानंतर तो सुरक्षित (वस्त्रांमध्ये) कीटमध्ये बांधला जातो. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग होऊ नये. तसेच महापालिकेची चमू तो मृतदेह थेट घाटावर घेऊन जाते. ती चमू सुद्धा पीपीई किट घालूनच असते. घाटावरही अंत्यसंस्कार करताना सुरक्षित किटचा वापर केला जातो. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना ती किट प्रशासनातर्फे उपलब्ध केली जाते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ही किट जाळून नष्ट केली जाते. रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही ही किट मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. अनेक नातेवाईकही आता याचा वापर करायला लागले आहे.
मंगळवारी दुपारी अंबाझरी घाटावर दोन कोरोना पॉझिटिव्ह मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पीपीई किट घाटावरच्या गेटवर उघड्यावर फेकल्या गेलेली होती. आता ही किट नेमकी कुणी फेकली हा प्रश्न आहे. मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यसंस्कारात वापरलेल्या गेलेली पीपीई किट घाटावर अशी उघड्यावरच फेकल्या जात असेल तर हे इतरांसाठी धोकादायक आहे.