सावधान! तलावात पोहता? होऊ शकतो परजीवीचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 07:00 AM2022-06-08T07:00:00+5:302022-06-08T07:00:15+5:30

Nagpur News पाण्यातील परजीवीमुळे तीन महिन्यांत ‘राइनोस्पोरिडिओसिस’चे चार रुग्ण आढळून आले आहेत. यातील एका रुग्णाला नाकात तर उर्वरित तीन रुग्णांच्या डोळ्यात ‘स्ट्रॉबेरी’सारखे मांस वाढले होते.

Be careful! Swimming in the pool? May be a threat to parasites! | सावधान! तलावात पोहता? होऊ शकतो परजीवीचा धोका!

सावधान! तलावात पोहता? होऊ शकतो परजीवीचा धोका!

Next
ठळक मुद्देतीन महिन्यांत ‘राइनोस्पोरिडिओसिस’चे चार रुग्णनाकात, डोळ्यात ‘स्ट्रॉबेरी’सारखे वाढते मांस

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनामुळे बंद असलेल्या ‘स्वीमिंग टॅँक’मुळे अनेकांनी गारेवाडा व अंबाझरी तलावावर गर्दी केली; परंतु पाण्यातील परजीवीमुळे तीन महिन्यांत ‘राइनोस्पोरिडिओसिस’चे चार रुग्ण आढळून आले आहेत. यातील एका रुग्णाला नाकात तर उर्वरित तीन रुग्णांच्या डोळ्यात ‘स्ट्रॉबेरी’सारखे मांस वाढले होते. यामुळे तलावात पोहत असाल तर सावधान, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मित्रांसह अंबाझरी तलावावर पोहत असलेले ६३ वर्षीय व्यक्ती दोन महिन्यांपासून नाकातील समस्येने त्रस्त होते. त्यांच्या उजव्या नाकपुडीतून रक्तही येत होते. कान, नाक व घसा (ईएनटी) शल्यचिकित्सक डॉ. समीर चौधरी यांनी त्यांची तपासणी केल्यावर नाकात ‘स्ट्रॉबेरी’सारखे मांस वाढल्याचे व त्यावर पांढरे ठिपके असल्याचे दिसून आले. त्याला स्पर्श केल्यास रक्तस्त्राव होत होता. हा ‘राइनोस्पोरिडिओसिस’ रोग असावा, असा संशय होता. त्यांनी त्यांच्यावर विवेका हॉस्पिटलमध्ये एन्डोस्कोपिक पद्धतीने शस्त्रक्रिया केली. यात डॉ. सानिका कळंबे यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आलेल्या मांसाचे ‘हिस्टोपॅथॉलॉजी’ चाचणी केल्यानंतर ‘राइनोस्पोरिडिओसिस’ आजार असल्याचे निदान झाले.

-तीन मित्रांनाही झाला आजार

‘लोकमत’शी बोलताना डॉ. चौधरी म्हणाले, या व्यक्तीचे तीन मित्र जे त्यांच्यासोबत अंबाझरी तलावावर पोहायचे, तेदेखील अलीकडच्या काळात डोळ्यात ‘राइनोस्पोरिडिओसिस’ने ग्रस्त होते. नुकतेच त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली.

-पूर्वी याला बुरशीजन्य आजार म्हणून पाहिले जात होते

पूर्वी ‘राइनोस्पोरिडिओसिस’ला बुरशीजन्य रोग म्हणून पाहिले जात होते; परंतु त्याचा अभ्यास केल्यावर तो ‘राइनोस्पोरिडियम सिबेरी’जलीय परजीवी असल्याचे पुढे आले. या रोगाची बहुसंख्य प्रकरणे भारत, पाकिस्तान व श्रीलंकेत आढळून येतात. याशिवाय आशिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि युरोपमधील इतर भागातही तुरळक प्रकरणे दिसून येतात.

-तलावातील दूषित पाण्यामुळे होतो आजार

मानवाव्यतिरिक्त ‘राइनोस्पोरिडिओसिस’ मांजरी, गुरेढोरे, कुत्री, बदके, बकरी, घोडे, खेचर, पोपट व बगळे यांच्यामध्येही आढळून आले आहे. हा रोग तलावातील दूषित पाण्यामुळे माणसांना होतो. संक्रमित पशू किंवा पाणपक्षीमधून हा पसरतो.

-रोगाने नाक व डोळे सर्वाधिक प्रभावित 

‘राइनोस्पोरिडिओसिस’ हा रोग सामान्यत: नाक आणि नाकामागील भाग प्रभावित करतो. शिवाय, डोळा, ओठ, टाळू, स्वरयंत्र, श्वासनलिका, स्त्रियांच्या बाह्य जननेंद्रियावरदेखील परिणाम करू शकतो. हा एक मंद गतीने वाढणारा रोग आहे, जो स्त्रियांपेक्षा पुरुषांना चारपट अधिक सामान्यपणे प्रभावित करतो. याची लक्षणे दिसताच किंवा शस्त्रक्रियेनंतरही नवीन लक्षणे आढळून येताच डॉक्टरांची संपर्क साधावा.

-डॉ. समीर चौधरी, ईएनटी सर्जन

Web Title: Be careful! Swimming in the pool? May be a threat to parasites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य