सावधान! मोबाईलवर बोलताना विजेच्या खांबाला टेकू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:30 AM2018-06-11T11:30:00+5:302018-06-11T11:30:19+5:30
सावधान ..., विजेच्या खांबाला टेकू नका. करंट लागू शकतो, तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. होय, नागपुरात कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री अशी घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सावधान ..., विजेच्या खांबाला टेकू नका. करंट लागू शकतो, तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. होय, नागपुरात कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री अशी घटना घडली. मोबाईलवर बोलताना एक तरुण विजेच्या खांबाला टेकून उभा राहिला अन् त्याला करंट लागल्याने त्याचा जीव गेला.
करण ओमप्रकाश पारवे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पारडीतील (कळमना) कोष्टीपुऱ्यात राहत होता. करण शनिवारी रात्री ९.५० वाजता मोबाईलवर बोलत होता. बोलता बोलता तो रस्त्याच्या बाजूला आला. कोपऱ्यावर असलेल्या विजेच्या खांबाला टेकून करण उभा राहिला अन् घात झाला. त्याला विजेचा जोरदार करंट लागला. त्यामुळे करण बेशुद्ध पडला. या घटनेमुळे परिसरात धावपळ निर्माण झाली. करणला मेयोत नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तेथील डॉक्टरांनी करणला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे पारडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला.