सावध व्हा! नायलॉन मांजामुळे मेंंदूला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापली जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 08:10 AM2023-01-11T08:10:00+5:302023-01-11T08:10:02+5:30

Nagpur News नायलॉन मांजामुळे गळा चिरून मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापत असल्याने, या मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

Be careful! The nylon sheath cuts the artery that supplies blood to the brain | सावध व्हा! नायलॉन मांजामुळे मेंंदूला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापली जाते

सावध व्हा! नायलॉन मांजामुळे मेंंदूला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापली जाते

Next
ठळक मुद्दे पतंगाच्या हुल्लडबाजीत ‘सुरे’ ठरतात मांजे

नागपूर : न तुटणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असताना शहराच्या विविध ठिकाणी लपूनछपून अवाच्या सव्वा दरात विक्री सुरू आहे. कोंबडीसारखा गळा कापला जावा, असे तीक्ष्ण स्वरूप या मांजाला प्राप्त झाले आहे. या मांजाने गेल्या दहा वर्षांत उपराजधानीत पन्नासाहून जास्त जणांचा बळी गेला, तर शेकडो लोकांचा जीव धोक्यात आला. नायलॉन मांजामुळे गळा चिरून मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनीच कापत असल्याने, या मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच पतंग उडविण्याचे आकर्षण असते. मात्र, या आनंदात आता ‘स्पर्धा’ आली आहे. आपला पतंग कापलाच जाऊ नये यासाठी उच्चप्रतीचा दोरा, त्याला काचेचा चुरा लावणे आणि याही पलीकडे जाऊन नायलॉन दोरा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मनपा व पोलिसांकडून विक्रेत्यांवर कारवाई सुरू असतानाही लपूनछपून मांजाची विक्री सुरू आहे. यामुळे रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या दुचाकीस्वारांसोबतच आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचा हकनाक बळी जात आहे.

गळा चिरल्यास मृत्यूचा धोका 

ज्येष्ठ कान, नाक व घसारोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत निखाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, गळ्यातील श्वासनलिका व ‘जुगलर’ रक्तवाहिनी ही खूप पातळ असल्याने गळ्याला धारधार वस्तू लागल्यास ती कापून मृत्यूचा धोका निर्माण होतो. गळ्यातून मेंदूकडे जाणारी ‘कॅरोटीड्’ धमनी व मेंदूकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे नेणारी ‘जुगलर’ रक्तवाहिनी फाटून मृत्यूची भीती असते. या मांजाने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतला आहे. यामुळे नायलॉन मांजाचा वापर टाळायलाच हवा.

साध्या दोराने पतंग उडविण्याचा आनंद घ्या 

सीएससी ऑलराउंडरचे संचालक अमोल खंते म्हणाले, दुसऱ्याचा पतंग कसा कापता येईल, याकडे लक्ष न देता पतंग उडविण्याचा आनंद घ्या. शहराच्या बाहेर निर्सगरम्य ठिकाणी कुटुंबासोबत पतंग उडवा. मांजाचा उपयोग न करता साध्या दोऱ्याने पतंग उडवा. पतंग उडवून झाल्यावर पतंग उतरवून स्वत:कडे ठेवा. यामुळे पक्ष्यांपासून ते मनुष्यांपर्यंत सर्वच सुखरूप राहतील. यासंदर्भातील आवाहन आम्ही मोबाइलच्या मदतीने एका युवकाकडून दुसऱ्या युवकाकडे पाठवीत आहोत.

आज माझ्या मुलीचा गळा चिराला, उद्या तुमचा...

शुक्रवारी सायंकाळी फारुखनगर येथील आपल्या घराच्या परिसरात खेळत असलेल्या सातवर्षीय मुलीचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला. तिला २६ टाके लागले. या मुलीचे वडील मोहम्मद हसमद शेख यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, माझ्या मुलीचा जीव थोडक्यात वाचला. आज माझ्या मुलीचा गळा चिरला, उद्या तुमचा किंवा तुमच्या मुलाचा चिरेल. यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की, पतंग उडवताना नायलॉन किंवा इतर मांजाचा वापर करू नका.

Web Title: Be careful! The nylon sheath cuts the artery that supplies blood to the brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.