सावधान, जिल्ह्यात मंगळवारी अति मुसळधार पावसाचा अंदाज
By निशांत वानखेडे | Published: July 17, 2023 05:03 PM2023-07-17T17:03:05+5:302023-07-17T17:04:57+5:30
हवामान खात्याचा इशारा : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सतर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये १७ ते २१ जुलै २०२३ या कालावधीत वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. मात्र मंगळवार १८ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा अंदाजासह वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढच्या २७ जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मान्सूनचा आस सरासरी जागेपासून दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता, बंगालच्या उपसागरातील चक्रिय वारा अभिसरण प्रणालीतून उत्तर ओडीशा, पश्चिम बंगाल, झारखंड राज्याच्या भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्रामुळे चक्रिय वाऱ्यांचे वायव्य दिशेने मध्य भारताकडे हाेणाऱ्या मार्गक्रमणाच्या शक्यतेमुळे मध्य भारत व महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याचे परिणाम विदर्भावरही दिसून येणार आहेत.
दरम्यान हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यासाठी १८ जुलै राेजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून या दिवशी काही ठिकाणी जोरदार ते खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसासह वादळीवारा व वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केला आहे. स्वरक्षणासाठी शासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी
- वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडा खाली उभे राहू नये.
- नदी व नाल्याच्या पुलावरून जर पाणी वाहत असेल तर धाडस करून कुठल्याही प्रकारे पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
- नदी, तलाव व धरणे या ठिकाणी नागरिकांनी विशेष: युवकांनी पाण्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नये