काळजी घ्या! व्हायरलचा कालावधी वाढतोय; ‘एच३एन२’ साथीचा धोका

By सुमेध वाघमार | Published: March 10, 2023 07:20 PM2023-03-10T19:20:43+5:302023-03-10T19:21:08+5:30

Nagpur News व्हायरल इंफेक्शन साधारणत: तीन-चार दिवसांचे राहायचे. मात्र, हल्ली याचा कालावधी वाढल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे इंफेक्शन प्रामुख्याने ‘एच३एन२’ या विषाणूमुळे होत असल्याचे पुढे आले आहे.

Be careful! Viral duration is increasing; Threat of 'H3N2' Pandemic | काळजी घ्या! व्हायरलचा कालावधी वाढतोय; ‘एच३एन२’ साथीचा धोका

काळजी घ्या! व्हायरलचा कालावधी वाढतोय; ‘एच३एन२’ साथीचा धोका

googlenewsNext

नागपूर : व्हायरल इंफेक्शन साधारणत: तीन-चार दिवसांचे राहायचे. मात्र, हल्ली याचा कालावधी वाढल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण इस्पितळात भरती होत आहेत. हे इंफेक्शन प्रामुख्याने ‘एच३एन२’ या विषाणूमुळे होत असल्याचे पुढे आले आहे.

-१९६८ मध्ये या व्हायरसची होती लाट

ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ व विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले, ‘एच३एन२’ हा ‘इंफ्लुएंजा-ए’ व्हायरसचा उपप्रकार आहे. १९६८ साली त्याची साथ आली होती. त्यामध्येही दहा लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. ‘आयसीएमआर’ने हा ‘एच३एन२’ विषाणूमुळे विकार होत असल्याचे स्पष्ट केले आहे. कोविडसारखे ‘ड्रॉपलेट’च्या माध्यमातून पसरणारा व्हायरस असून रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर एक ते चार दिवसात याची लक्षणे दिसून येतात.

-ही आहेत लक्षणे

कफ, ताप, गळ्याला सूज, सर्दी, अंगदुखी, थंडी वाजणे, अंग थरथरणे, अशक्तपणा आणि विशेषत: लहान मुलांमध्ये उलटी व हगवण अशी लक्षणे आहेत. सहव्याधी असणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि उपचारांमुळे इम्युनिटी कमी झालेले रुग्ण यांना या विकाराचा सर्वाधिक धोका आहे. न्यूमोनियासारखी गुंतागुंत होऊ शकते, श्वसनप्रणाली बंद पडू शकते आणि जीव जाण्याचा धोका होऊ शकतो.

-औषधोपचारासोबतच विश्रांती आवश्यक

‘एच३एन२’ व्हायरसमुळे होणाऱ्या विकारावर ‘ओसेल्टॅमिविर’, ‘झॅनामाविर’सारखी ‘ॲन्टिव्हायरल’ औषधे प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आवश्यक आहे.

-ही लक्षणे दिसताच रुग्णालयात भरती व्हा

श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, डिहायड्रेशन झाले असेल, भ्रमिष्टासारखे वाटत असेल तर इस्पितळात भरती होणे गरजेचे आहे. याशिवाय हृदयविकार, मधुमेह, उच्चरक्तदाब, किडनीचे विकार आणि अन्य सहव्याधी असल्यास अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

- हात धुवा, मास्क घाला

‘एच३एन२’सारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हात धुणे, मास्क घालणे, सहव्याधी असणाऱ्यांनी गर्दी टाळणे, खोकलताना रुमाल धरणे, सतत डोळे व तोंडाचा स्पर्श टाळा.

-जीवघेणा नसला तरी काळजी घ्या

‘एच३एन२’ विकार कोविडसारख्या किंवा यापूर्वीच्या ‘एच१एन१’ सारखा जीवघेणा नाही. योग्य काळजी घेतली आणि औषधोपचार केले तर रुग्णांना आराम पडतो. बरे होण्यास थोडा वेळ लागत असला तरी रुग्णांना आराम पडतो. फक्त कोमॉर्बिडिटी असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी.

-डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ

-स्वत:हून औषधी घेणे टाळा

सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे अंगावर काढू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वत:हून औषधी घेणे टाळा. सध्या मेडिकलमध्ये आठवड्यातून ‘एच३एन२’चे दोन ते तीन रुग्ण येत आहेत. हा आजार घाबरण्यासारखा नाही, तरीही काळजी घ्या.

-डॉ. प्रशांत पाटील, प्रमुख औषध वैद्यकशास्त्र विभाग मेडिकल

Web Title: Be careful! Viral duration is increasing; Threat of 'H3N2' Pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य