काळजी घ्या! सुट्यांमध्ये बाहेर फिरुन आलेल्यांना ‘व्हायरल’चा ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2023 06:57 PM2023-06-09T18:57:48+5:302023-06-09T18:58:19+5:30
Nagpur News जे उन्हाळी सुट्यांमध्ये बाहेरील देशात किंवा काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरून परत आलेले आहेत त्यांच्यात ‘व्हायरल’ दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : उपराजधानीतील वाढते तापमान असह्य होत असताना ‘व्हायरल इन्फेक्शन’मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: जे उन्हाळी सुट्यांमध्ये बाहेरील देशात किंवा काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरून परत आलेले आहेत त्यांच्यात ‘व्हायरल’ दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ताप, सर्दी, खोकला व काही रुग्णांमध्ये अतिसाराचे लक्षणे दिसून येत आहे. बहुसंख्य रुग्णांमध्ये हे सौम्य लक्षणे असलेतरी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
सध्या सकाळी कडक उन्ह, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम शरीरावर होतो. परंतु जे उन्हाळी सुटी घालविण्यासाठी इतर राज्यात गेलेले आहेत ते परतून आल्यावर त्यांच्यात व्हायरल इन्फेक्शन दिसून येत असल्याचे संसर्गजन्य रोग विषेज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी सांगितले. त्यांच्यातून इतरांना पसरत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, ही लक्षणे सौम्य आहेत. परंतु औषधोपचार करणे आवश्यक आहे.
-पाश्चात्य देशातून आलेल्यांनाही ‘व्हायरल’
ज्येष्ठ जनरल फिजिशियन डॉ. जय देशमुख यांनी सांगितले, पाश्चात्य देशात फिरून नागपुरात परत आलेल्यांमध्येही ‘व्हायरल इन्फेक्शन’ दिसून येत आहे. विशेषत: जे १५-२५ ग्रुपने गेले होते त्यांच्यात ‘व्हायरल’चे प्रमाण अधिक आहे.
-पाच दिवस राहतात लक्षणे
डॉ. देशमुख म्हणाले, ‘व्हायरल’च्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप, घश्यात खवखव ही लक्षणे दिसून येतात. साधारण चार-पाच दिवस लक्षणे असतात.
- जोखमीच्या रुग्णांनी काळजी घ्यायला हवी
हृद्य विकार, उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनी, यकृताचा आजार, अवयव प्रत्यारोपण झालेल्या या जोखमीच्या रुग्णांना व्हायरल झाला असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करायला हवे. वयोवृद्धांनीही अधिक काळजी घ्यायला हवी. विशेषत: मास्क वापरणे आवश्यक असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.