स्वत:जवळील सोयाबीन बियाणे वापरताना काळजी घ्या

By admin | Published: May 26, 2016 02:47 AM2016-05-26T02:47:35+5:302016-05-26T02:47:35+5:30

विभागामध्ये सोयाबीन हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असून केंद्र ..

Be careful when using the nearby soybean seeds | स्वत:जवळील सोयाबीन बियाणे वापरताना काळजी घ्या

स्वत:जवळील सोयाबीन बियाणे वापरताना काळजी घ्या

Next

कृषी सहसंचालकांचे आवाहन : बियाणे बदलाचे प्रमाण ६० ते ६५ टक्के
नागपूर : विभागामध्ये सोयाबीन हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्यामध्ये बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्के पर्यंत असणे आवश्यक आहे. त्या तुलनेत नागपूर विभागातील जिल्ह्यांचे सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे. हे प्रमाण किमान ३० टक्के जरी कमी केले तरी सोयाबीन उत्पादनामध्ये विशेष घट येणार नाही, असे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेल्या सोयाबीन बियाण्यांची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, खडे, लहान व फुटलेले बियाणे/दाणे वेगळे करावे. यासाठी कृषी विभागाच्या योजनेंतर्गत ग्रामस्तरावर शेतकरी गटांना वाटप केलेल्या ‘स्पायरल सेपरेटर’चा सुद्धा वापर करता येईल. बियाणे चाळणीनंतर स्वच्छ झालेले समान आकाराचे बियाणे उगवण चाचणीसाठी निवडावे. वर्तमानपत्राचा एक पुरेसा कागद घेऊन त्याला चार घड्या पाडाव्यात. ज्यामुळे कागदाची जाडी वाढेल. नंतर तो कागद पाण्याने ओला करावा व त्यावर प्रत्येकी दहा बिया (दाणे) घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठवून त्याची गुंडाळी करावी. अशा रीतीने शंभर बियांच्या दहा गुंडाळ्या तयार कराव्यात व त्या सर्व एका पॉलिथिन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये अंकुरीत झालेल्या बिया मोजाव्यात. जर अंकुरीत झालेल्या बियांची संख्या ८० असेल तर उगवण क्षमता ८० टक्के समजावी.
अशा पद्धतीने सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेचा अंदाज घेता येतो. सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता चांगली म्हणजे ७० टक्के असेल तर शिफारस केलेल्या मात्रेनुसार प्रति हेक्टर ७५ किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. उगवण क्षमता ६५ टक्के असेल तर ८१ किलो बियाणे, उगवण क्षमता ६० टक्के असेल तर ८७.५ किलो बियाणे, उगवण क्षमता ५५ टक्के असेल तर ९५.५ किलो बियाणे आणि उगवण क्षमता ५० टक्के असेल तर १०५ किलो बियाणे प्रति हेक्टर क्षेत्रासाठी वापरावे.
सोयाबीनची प्रत्यक्ष पेरणी करताना अतिरिक्त काळजी घेण्याची गरज असते. त्यासाठी ७५ ते १०० मि. मी. पर्जन्यमान झाल्यावरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्यांची पेरणी तीन ते चार से. मी. खोलीपर्यंत करावी, त्यापेक्षा जास्त खोलीवर पेरणी करू नये.
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम अथवा दोन ग्रॅम थायरम अधिक एक ग्रॅम कार्बेन्डेझीम या औषधाद्वारे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीज प्रक्रिया करावी. तसेच रायझोबियम व पी. एस. बी. या जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रती १० ते १५ किलो बियाण्यास प्रत्यक्ष पेरणीचे तीन तास अगोदर बीज प्रकिया करून असे प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे व त्याची पेरणी करावी. (प्रतिनिधी)

बियाणे खरेदी करताना सावधगिरी बाळगा
बियाणे खरेदी करून पेरणी करावयाची असल्यास बियाणे विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करताना पावती घेणे आवश्यक आहे. पावतीवर बियाणे उत्पादक कंपनीचे पूर्ण नाव, वाण, लॉट क्रमांक, तपशील आवश्यक आहे. बियाणे पिशवी व त्याला असलेले लेबल, खरेदी पावती पीक काढणी होईपर्यंत जपून ठेवावी. बी. बी. एफ यंत्रणेद्वारे सोयाबीनची पेरणी करावी. त्यामुळे जास्त किंवा कमी पावसाचा पिकावर कमी परिणाम होतो व पीक उत्पादनात वाढ होते. तसेच बियाणे ठराविक अंतरावर पेरल्यामुळे बियाण्यांची बचत होते, असे आवाहनही विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Be careful when using the nearby soybean seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.