सुंदरीशी चॅटिंग करताना सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:43+5:302021-06-17T04:06:43+5:30
तिच्या जाळ्यात फसू नका : हनी ट्रॅप वाढलेत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सध्या सर्वत्र हनी ट्रॅप वाढले ...
तिच्या जाळ्यात फसू नका : हनी ट्रॅप वाढलेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या सर्वत्र हनी ट्रॅप वाढले आहेत. कोणत्याही प्रकारची शारीरिक दुखापत न करता तुमच्याकडून लाखो रुपये उकळण्याचा हा फंडा आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यासाठी सुंदर ललनांना तयार केले आहे. तुमच्या फेसबुक, व्हाॅट्सॲपवर त्यांचा मेसेज कधीही येऊ शकतो. त्यामुळे सावधान !
अनोळखी सुंदरीचा मेसेज आल्यास भाळून जाऊ नका. हा हनी ट्रॅपचा प्रकार आहे, हे लक्षात असू द्या.
एखादवेळी तुमच्या मोबाईलवर हाय डियर... कितने साल हो गये. मिले नही आप. रश्मी से तुम्हारा नंबर मिला... असा मेसेज येतो. ज्या नंबरवरून मेसेज येतो, त्याचा डीपी अर्थातच एका सुंदरीचा असतो. एवढी सुंदर तरुणी / महिला आपल्याला मेसेज पाठवते, हे पाहून तुमचे कुतूहल जागे होते. अनेक जण लगेच ''सॉरी मैने आपको पहचाना नही'', असा मेसेज पाठवतात.
त्यानंतर तिकडून ''अच्छा क्या.. अब पहचानते नही... स्कूल,कॉलेज मे तो आगे पिछे घुमते थे... असा पुन्हा मेसेज येतो. यावेळी मात्र उसनी ओळख काढून, अच्छा तुम हो, असे म्हणत तिच्यात गुंतत जातो. त्यानंतर तुम्हाला जाळ्यात ओढण्याची अर्थात हनी ट्रॅपची ही पहिली स्टेप असते. या
पहिल्या स्टेपमध्ये तुमची आर्थिक आणि सामाजिक स्थिती कशी आहे, त्याची ती ललना माहिती काढून घेते. तुम्ही सुसंपन्न कुटुंबातील असल्याचे, तुमची सामाजिक प्रतिष्ठा चांगली असल्याचे लक्षात येताच दुसरी फसवणुकीची स्टेप सुरू होते. तुम्हाला एक व्हिडिओ कॉल येतो. कॉल करणारी ती तुमची कथित मैत्रिण (ललना) अर्धनग्न असते. ती तुम्हाला ऑनलाईन सेक्सची ऑफर देते. स्वतः विवस्त्र होतानाच तुम्हालाही तसेच होण्यास बाध्य करते. तुम्ही जर तिचे म्हणणे मानले तर तुमचा सायबर गुन्हेगार अश्लील व्हिडिओ तयार करतात आणि काही क्षणातच तुम्हाला तो पाठवतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करून तुमचे कौटुंबिक आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली जाते. हे टाळायचे असेल तर तुम्हाला मोठ्या रकमेची मागणी केली जाते. बदनामी होऊ नये म्हणून तुम्ही त्या गुन्हेगाराने दिलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करतात. तुम्ही ज्या क्षणी त्यांना पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा इशारा देता, त्याचक्षणी ते गुन्हेगार तुमच्याशी संपर्क तोडतात. हनी ट्रॅप करणाऱ्या गुन्हेगारांची ही पद्धत आहे.
----
तक्रारीचे प्रमाण नगण्य
हनी ट्रॅपचे प्रकार सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू असून या ट्रॅपमध्ये अनेक जण अडकतात. मात्र पोलिसांकडे गेल्यास बदनामी होईल, या भीतीने ते तक्रार करण्याचे टाळतात. नागपूर शहरात असे वर्षभरात शंभरपेक्षा जास्त प्रकार घडले आहेत. मात्र सायबर अधिकाऱ्यांच्या मते त्यांच्याकडे केवळ पाच जणांच्याच अधिकृत तक्रारी आल्या आहेत.
---
घाबरू नका पोलिसांकडे या !
अशाप्रकारे तुम्हाला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न कुणी केला असेल किंवा तुम्ही त्यात अडकले असाल तर घाबरू नका. थेट सायबर पोलिस ठाण्यात या, असे आवाहन स्थानिक सायबर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
---