रोगमुक्त नव्हे, आरोग्ययुक्त व्हा
By admin | Published: May 21, 2017 02:24 AM2017-05-21T02:24:16+5:302017-05-21T02:24:16+5:30
वैद्यकशास्त्र सतत प्रगतिशील असतानासुद्धा आजाराचे वाढते प्रमाण हा नेहमी चिंतेचा विषय ठरला आहे.
संजय गाडेकर : जीर्ण पोटविकार व कठीण आजारावर ‘युनिव्हर्सल ट्रीटमेंट’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकशास्त्र सतत प्रगतिशील असतानासुद्धा आजाराचे वाढते प्रमाण हा नेहमी चिंतेचा विषय ठरला आहे. विशेषत: जीर्ण पोटविकार व इतरही कठीण आजारांचे प्रमाण हे दिवसागणिक वाढत आहे. यकृत (लिव्हर), मूत्रपिंड (किडनी)सारख्या महत्त्वाचे अवयव निकामी होणे व त्याच्या प्रत्यारोपणाचे प्रमाणही वाढले आहे. जीर्ण आजारावर ‘पॅसिव्ह’ वैद्यकीय उपचार व शरीर आतून बळकट करण्याचे ‘अॅक्टिव्ह’ उपचाराचे प्रयत्न प्रभावी ठरतात. यासाठी ‘युनिव्हर्सल ट्रीटमेंट’ महत्त्वाची ठरते. या उपचाराने रुग्ण रोगमुक्त नव्हे तर आरोग्ययुक्त होण्यास मदत होते, अशी माहिती वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. संजय गाडेकर यांनी दिली.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. गाडेकर म्हणाले, आपले शरीर हे ब्रह्मांड विज्ञानाची एक सुरेख उत्पत्ती आहे. बीजांड फलनापासून ते आपले शरीर हळूहळू तयार होते. त्याचा जन्म होण्यासाठीचा एक निश्चित ब्रह्मांडीय क्रयमार्ग (युनिव्हर्सल सर्किट आॅफ बॉडी मेकिंग) असतो. जन्मानंतर आपल्या शास्त्रशुद्ध शरीर राखण्याचासुद्धा एक ब्रह्मांडीय क्रयमार्ग (युनिव्हर्सल सर्किट आॅफ बॉडी कीपिंग) असतो. पण ही क्षमता आपणास उपजत नसते. तिचे योग्य अवलोकन करून ती व्यवस्थित आपल्यात बिंबवावी लागते. ही क्षमता इतर प्राण्यांमध्ये उपजत असते व त्यामुळे त्यांचे शरीर आपोआप योग्यरीत्या राखल्या जाते. त्यामुळेच नैसर्गिक वातावरणात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये आजारांचे प्रमाण माणसाच्या तुलनेत बरेच कमी असते.
प्राणी साधारण आजारांचे उपचार स्वत: करताना आढळतात. कुठला त्रास झाल्यास त्यासाठी विशिष्ट झाडपाने खाणे किंवा विशिष्ट कृती त्यांच्याकडून केल्या जातात. त्यामुळेही त्यांच्यात वाढीव आजारांचे प्रमाण कमीच असते.
इतर प्राण्यांपेक्षा ब्रह्मांडाने मनुष्याला प्रचंड बुद्धिमत्ता प्रदान केल्यामुळे या दोन्ही क्षमता आपल्याला उपजत आढळत नाहीत. त्यामुळे ब्रह्मांडीय नियमानुसार शरीर राखण्यासाठी त्यासाठीच्या ब्रह्मांडीय क्रयमार्गाचे व्यवस्थित अवलोकन करून ते आत्मसात केल्यानेच आपणास आरोग्यप्राप्ती होऊ शकते. पण काही ब्रम्हांडीय उपजत क्षमतेच्या उणिवेमुळे आपले शरीर हळूहळू खंगते व कालांतराने एक किंवा अनेक आजार जन्म घेण्याची शक्यता वाढते. यालाच आपण मानवी जीवनमानामुळे झालेले ‘डिजनरेटिव्ह डिसिज’ असे संबोधतो.
डॉ. गाडेकर म्हणाले, अल्सरपासून ते कॅन्सरपर्यंतच्या आजारावर विविध वैद्यकशास्त्रांतर्गत उपचार केले जातात. शरीराच्या बाहेरील माध्यमातून केले गेलेले उपचार हे ‘पॅसिव्ह’ उपचार म्हणून गणल्या जातात. या उपचारांमुळे आपणास रोगमुक्त होण्यास मदत होते. पण आरोग्ययुक्त होण्यासाठी शरीराच्या आतील ‘अॅक्टिव्ह रिजनरेटिव्ह’ उपचाराचा प्रयत्न आवश्यक असतो.
आपले उत्कृष्ट आरोग्य हे आपल्या शरीरातील तीन महत्त्वाच्या प्रणालींच्या खांबांवर उभे असते. ते खांब म्हणजे समतोल प्रणाली, प्रतिकारशक्ती व आपल्या स्टेमसेल्स (मूळ पेशी). आपल्या शरीरातील व्याधीग्रस्त वा जखमी पेशींचे पुनर्वसन या आपल्या स्टेमसेल्स करीत असतात.
या स्टेमसेल्स निरंतर सक्षमपणे कार्यरत असल्या तर आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. या स्टेमसेल्स निरंतर सक्षम राखणे म्हणजेच स्टेमसेल अॅक्टिव्हेशन’ होय. स्टेमसेल्स निरंतर सक्षम व उत्कृष्टपणे कार्यरत राहिल्याने आजारी पडण्याची वा आजार बळावण्याची शक्यता आपोआपच कमी होते. सोबतच आजारांवर केलेले वैद्यकीय उपचार हे जास्त परिणामकारक व परिपूर्ण होतात. वैद्यकीय उपचारांची मात्रासुद्धा कमी होण्यास मदत होते. विशिष्ट ‘पॅसिव्ह’ वैद्यकीय उपचार व शरीर आतून बळकट करण्याचे ‘अॅक्टिव्ह’ उपचाराचे प्रयत्न म्हणजेच ‘युनिव्हर्सल ट्रीटमेंट’.
युनिव्हर्सलचा अर्थ म्हणजे ब्रह्मांडीय नियमानुसार व संपूर्ण शरीराच्या योग्य आरोग्यासाठी. यामुळे उपचारांनी नुसते रोगमुक्तच नव्हे तर आरोग्ययुक्त होण्यास मदत होते. आरोग्ययुक्त शरीरच आपल्याला शेवटपर्यंत निरोगी जीवनाची ग्वाही देत असते, असेही डॉ. गाडेकर म्हणाले.