कोव्हिड-१९ मुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 07:45 PM2020-04-07T19:45:34+5:302020-04-07T19:49:35+5:30

मुंबई व अन्य काही शहरातील परिस्थिती बघता नागपुरातही जर तशी वेळ आली तर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहा. रुग्णालये, उपकरणे व संबंधित वस्तूंचा साठा ठेवा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिले.

Be prepared to handle the situation that is caused by Covid-19 | कोव्हिड-१९ मुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहा

कोव्हिड-१९ मुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहा

googlenewsNext
ठळक मुद्देलोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक प्रत्येकाला रेशन द्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्येकाला स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, त्यामध्ये येणा?्या तांत्रिक अडचणी लोकप्रतिनिधींनी मांडल्या. यासंदर्भात ज्या लोकांना रेशन मिळत नाही, त्यांची यादी तयार करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती सध्यातरी आटोक्यात आहे. मात्र मुंबई व अन्य काही शहरातील परिस्थिती बघता नागपुरातही जर तशी वेळ आली तर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहा. रुग्णालये, उपकरणे व संबंधित वस्तूंचा साठा ठेवा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिले.
कोव्हिड-१९ चा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचे प्रभारी करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. ७) त्यांनी महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे लोकप्रतिनिधी व अधिकऱ्यांच्या उपस्थितीत कोव्हिड-१९ संदर्भातील सद्यपरिस्थिती, केलेल्या उपाययोजना, अंमलबजावणी आणि भविष्यातील तयारी याचा आढावा घेतला. बैठकीला नितीन गडकरी यांच्यासह महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, खासदार विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, आमदार नागो गाणार, आमदार विकास कुंभारे, आमदार गिरीश व्यास, आमदार मोहन मते, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त (नागपूर विभाग) अभिजीत बांगर, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची उपस्थिती होती. मनपाचे स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) श्वेता खेडकर, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, एम्सच्या मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे ओएसडी डॉ. फूलपाटील, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम नागपुरात असलेल्या वैद्यकीय सोयींचा आढावा घेतला. नागपुरात सुदैवाने परिस्थिती सध्यातरी आटोक्यात आहे. परंतु भविष्यात जर अधिक रुग्ण आढळले तर त्या परिस्थितीशी लढण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा. मेयो, मेडिकल आणि एम्स यांनी समन्वय ठेवून आवश्यक असलेली किट, औषधी, मास्क आदींचा योग्य साठा करून ठेवावा. व्हेंटिलेटर्स, आॅक्सीजन व अन्य सामुग्रीची व्यवस्था ठेवावी. जिथे अडचण येत असेल, तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या अधिकारात ती व्यवस्था करून ठेवा, असे निर्देश दिले.
कोव्हिड-१९ च्या चाचणीसाठी आवश्यक असलेल्या किटची उपलब्धता मुबलक असू द्यावी. मेयोच्या प्रयोगशाळेत काही अडचणी आल्यामुळे चाचण्यांची गती मंदावली होती. आता ती पूर्ववत झाली आहे. एम्समधील प्रयोगशाळा सुरू झाली असून मेडिकलमधील प्रयोगशाळेलाही मान्यता मिळाली आहे. एक-दोन दिवसात तीसुद्धा सुरू होईल. त्यामुळे यापुढे चाचण्यांसाठी आलेल्या नमुन्यांची तातडीने चाचणी करा, असेही निर्देश गडकरी यांनी दिले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनातर्फे उचलण्यात आलेली पावले आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजना, त्याची अंमलबजावणी यासंदर्भात माहिती दिली. रस्त्यावरील व्यक्तींसाठी बेघर निवारा तयार करण्यात आले असून तेथे त्यांच्या चहा, नाश्ता आणि दोन वेळच्या भोजनाची सोयी केली जात असल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त (नागपूर विभाग) अभिजीत बांगर यांनी वैद्यकीय सेवेसंदर्भात उपलब्ध सोयी, प्रस्तावित सोयी याबाबत माहिती दिली.

मनपाच्या रुग्णवाहिका सज्ज ठेवा
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका सेवा कोलमडली आहे, यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी सांगितले असता नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकांसह खासदार निधीतून मनपाला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सहा रुग्णवाहिकाही पूर्णपणे तयार ठेवा. या सहा रुग्णवाहिकांपैकी तीन मेडिकल आणि तीन मेयोकडे सोपवा, असे निर्देशही गडकरी यांनी दिले.

काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई
लॉकडाऊनचा फायदा घेत नागपुरात तेल, दाळ व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केला जात असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे. अधिकारी यासंदर्भात कठोर भूमिका घेताना दिसत नाही, असे म्हणत गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे काळाबाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले.

Web Title: Be prepared to handle the situation that is caused by Covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.