उष्णतेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा; पुढचे ५ दिवस पारा २ ते ४ अंशाने वाढणार!
By निशांत वानखेडे | Published: April 29, 2024 08:08 PM2024-04-29T20:08:58+5:302024-04-29T20:11:16+5:30
अवकाळी पावसाचे सावट संपले; सर्वाधिक ४२.३ अंश तापमान अकाेल्यात
निशांत वानखेडे, नागपूर: गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा व राज्याच्या काही भागावर असलेले अवकाळी पावसाचे सावट आता संपले आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात पावसाळ्यासारखा वाटलेला उन्हाळा आता आपल्या रंगात येण्याची शक्यता आहे. यापुढे पारा हळूहळू वर चढणार असून नागरिकांना दिवसा उन्हाचे चटके, उष्णता व रात्री उकाड्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागेल.
एप्रिल महिन्याचे २० ते २२ दिवस आकाशात ढग आणि अवकाळी पावसाचे सावट हाेते. नागरिकांना माेजक्या दिवशी उन्हाचे चटके बसले व उष्णतेची जाणीव झाली. दमट उकाड्याचा अनुभव मात्र नागरिकांनी घेतला. साेमवार २९ एप्रिल हा या अवकाळी वातावरणाचा शेवटचा दिवस राहणार असून महाराष्ट्रात वीजा, वारा, गारा व अवकाळी पावसासारख्या वातावरणापासून सुटका मिळेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.
यापुढे मध्य भारत, विदर्भ, मराठवाडा, खांदेश व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात दिवसाचे कमाल तापमान २ ते ४ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हा ताप तीव्र हाेणार आहे. दिवस व रात्रीच्या दोन्हीही तापमानात मात्र हळूहळू वाढीची शक्यता असून जन-जीवनाला असह्य उष्णता व उकाड्याशी सामना करावा लागेल. दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा परिणाम अधिक जाणवेल. काेकणात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान साेमवारी अवकाळीचा अंदाज असला तरी नागपूरसह विदर्भाचा पारा वर उसळला. गाेंदिया वगळता सर्व १० जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंशाच्या वर पाेहचले. नागपूर २४ तासात २.७ अंशाने वाढून ४०.१ अंशावर गेले आहे. सर्वाधिक ४२.३ अंश तापमान अकाेला येथे नाेंदविण्यात आले.
गाेंदियाचा पारा ४.४ अंशाने उसळला. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळात तापमान ४१ अंशावर आहे. रात्रीच्या तापमानात अंशत: घट नाेंदविण्यात आली असली तरी ३० एप्रिलपासून पुढे त्यात वाढ हाेण्याचा अंदाज आहे.