नोंदणी करायचीय, धर्म आणि जात सांगा; अनेक विद्यार्थ्यांची नोंदणीप्रक्रिया अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:46 PM2017-08-31T22:46:07+5:302017-08-31T22:46:14+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव असले तरी नागपूर विद्यापीठ त्यांच्या शिकवणीवर चालत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाचे पदव्युत्तर शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेंतर्गत धर्म आणि जातीचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नागपूर, दि. 31 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव असले तरी नागपूर विद्यापीठ त्यांच्या शिकवणीवर चालत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाचे पदव्युत्तर शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेंतर्गत धर्म आणि जातीचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र काही विद्यार्थ्यांकडून जात व धर्म मानण्यात येत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या ‘आॅनलाईन’ अर्जांचा स्वीकारच होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची नोंदणी प्रक्रिया अडचणीत आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विद्यापीठाच्या या भूमिकेमुळे नागपूरसोबतच देशातील दुस-या राज्यांतून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश संकटात आले आहे. काही विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षणापासूनच धर्म आणि जातीचा उल्लेख केलेला नाही. तर काही विद्यार्थ्यांच्या ‘टीसी’वर धर्म, जातीची नोंद नाही. मात्र नोंदणी प्रक्रियेत जात व धर्म टाकणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण जात आहे.
काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यापीठाच्या अधिका-यांकडे दिलासा देण्याची मागणी केली होती. मात्र राज्य शासनाच्या निर्देशांचा हवाला देत त्याला मान्य करण्यास अधिका-यांनी नकार दिला.
ईशान्येकडील राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसतो आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांना संपर्क केला असता, विद्यापीठ राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘आधार’ अनिवार्यच...
विद्यापीठात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना आधार कार्डाची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अनेक विद्यार्थ्यांना सरकारकडून कुठलीही शिष्यवृत्ती मिळत नाही. शासनाच्या कुठल्याही योजनेत त्यांचा सहभाग नाही. मात्र तरीदेखील त्यांना आधार कार्ड क्रमांक मागण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानेच आधार कार्ड क्रमांक अनिवार्य केला आहे, असे डॉ. खटी यांनी सांगितले.