प्रेरणाभूमीत उसळणार भीमसागर!
By admin | Published: April 14, 2016 03:17 AM2016-04-14T03:17:20+5:302016-04-14T03:17:20+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात येत आहे.
शतकोत्तर रौप्य महोत्सव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात येत आहे. भीम जयंती साजरी करण्यासाठी प्रेरणाभूमी असलेल्या नागपुरातही शेकडो संघटना कामाला लागल्या आहेत. यामध्ये आंबेडकरी अनुयायांसह विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघटना तसेच शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालयातही भीम जयंतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानाने समतावादी लोकशाही राष्ट्र बहाल करून अखंड भारताचा राजकीय, सामाजिक व आर्थिक पाया भक्कमपणे बसविणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सर्व समाज एकवटला आहे.
भारतीय जनता पक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे गुरुवारी सकाळी ९.३० वाजता शहीद गोवारी स्मारक ते संविधान चौकापर्यंत अभिवादन मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, खासदार अजय संचेती, माजी खा. बनवारीलाल पुरोहित, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. अनिल सोले, आ.ना.गो. गाणार, आ. गिरीश व्यास, महापौर प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत आदी मान्यवर सहभागी होतील.
परमाणू खनिज अन्वेषण व अनुसंधान निदेशालय
परमाणू खनिज अन्वेषण व अनुसंधान निदेशालय, मध्यक्षेत्र, नागपूर कार्यालयातर्फे १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यालयात सकाळी ११ वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्य नागरी जयंती समिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य संयुक्त जयंती समितीच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रीय व सामाजिक एकतेकरिता १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता दीक्षाभूमी ते संविधान चौक व परत दीक्षाभूमीपर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
डॉ. बी.आर. आंबेडकर वेट्स असोसिएशन
पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. बी.आर. आंबेडकर वेट्स असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जयंती समारोहाची रक्तदान शिबिराने सांगता होणार आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरण
भारतीय विमानतळ प्राधिकरण, मिहान इंडिया लिमिटेड तसेच अनुसूचित जाती-जनजाती कर्मचारी कल्याण संघटनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे गुरुवारी सकाळी १० वाजता डॉ. आंबेडकर जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. विमानतळ संचालक अवधेश प्रसाद यांच्या उपस्थितीत भन्ते सुरई ससाई यांच्या हस्ते १२५ भन्तेजींना चिवरदान करण्यात येईल.
भारतीय जीवन विमा निगम
भारतीय जीवन विमा निगम, नागपूर मंडळ कार्यालयातर्फे गुरुवारी सकाळी ९.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य विज्ञान शिक्षण संस्था
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. सकाळी १० वाजता अभिवादनानंतर विजय मेश्राम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
पंचशील तरुण उत्सव मंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंचशील तरुण उत्सव मंडळातर्फे जयभीमनगर, त्रिशरण चौक येथे सकाळी ८ वाजता सामूहिक बुद्धवंदना व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. आॅर्केस्ट्रा, १६ एप्रिल रोजी चित्रकला स्पर्धा व भीम-बुद्ध गीतांची स्पर्धा, १७ एप्रिल रोजी रामपाल महाराजांचे खंजेरी वादन व प्रबोधन.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीच्यावतीने डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंती महोत्सवाअंतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय समाज व्यवस्थेविषयी चिंतन’ या विषयावर निवृत्त न्यायाधीश बी.जे. कोळसे पाटील यांचे व्याख्यान गुरुवारी सायंकाळी ५ वाजता दीक्षाभूमी येथे आयोजित करण्यात आले आहे.
भीमक्रांती महासंघ
धम्मगर्जना चौक, स्वातंत्र्यनगर, नंदनवन येथे गुरुवारी सकाळी ९ वाजता धम्मध्वजारोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ एप्रिल रोजी मेयो रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिराने जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे.
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना
जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर नव्याने स्थापित झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने गुरुवारी डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रसार समिती
काचीमेट येथील बौद्धविहारात गुरुवारी सकाळी ८ वाजता धम्मध्वजारोहण व त्रिरत्नवंदना घेण्यात येईल. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रा. जगन वंजारी व माहिती संचालक मोहन राठोड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता विहारातून धम्मरथ मिरवणूक काढण्यात येईल व रात्री ८ वाजता बुद्ध-भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्यावतीने उंटखाना चौक येथे सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध गझल गायक अनिल भगत यांच्या आंबेडकरी जलसाचे आयोजन करण्यात येणार आहे.
बहुजन आधार संघ
बहुजन आधार संघ महाराष्ट्र प्रदेशतर्फे अध्यक्ष धीरज गजभिये, चंदा भेंडे व दिलीप तिरपुडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी १ वाजता यशवंत स्टेडियम, धंतोली ते संविधान चौकापर्यंत महामानव अभिवादन महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दलित, ओबीसी, आदिवासी, मुस्लीम, भटके विमुक्त जाती व धार्मिक अल्पसंख्यक एकतेचा संदेश या रॅलीतून देण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने टेलिफोननगर चौक येथून विविध मार्गाने डॉ. आंबेडकर अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता आमदार सुधाकर कोहळे या रॅलीचे उद््घाटन करतील.
मानेवाडा रोड मजूर ठिय्या
फत्तुजी बावणे यांच्यातर्फे मानेवाडा रोड लेबर मजूर ठिय्या पोस्ट आॅफिसजवळ सकाळी ९ वाजता थंड पाण्याच्या प्याऊचे उद््घाटन होणार आहे.
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने यशवंत स्टेडियम, धंतोली येथील कार्यालयात दुपारी २ वाजता सार्वभौम कार्यकर्ता सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुरातत्त्व विभागाचे माजी अधीक्षक एन.जी. निकोशे यांचे व्याख्यान यावेळी होईल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी करण्यात येणार आहे. कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे यांच्या उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन होईल.
धनवटे नॅशनल कॉलेज
धनवटे नॅशनल कॉलेज येथे गुरुवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय छात्र सेना
राष्ट्रीय छात्र सेना गट मुख्यालय, तेलंगखेडी येथे सकाळी ८.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
समता सैनिक दल
सिद्धार्थनगर, मानेवाडा रिंगरोड येथे सायंकाळी ५.३० वाजता समता सैनिक दल, दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे सेंट्रल कमांड कार्यालयाचे उद््घाटन करण्यात येईल.
संयुक्त समारोह समिती
सूरज सोसायटी, डीपी रोड, मनीषनगर येथे सकाळी ६ वाजता ‘नवचैतन्याची निळी पहाट’ बुद्ध-भीमगीतांचा कार्यक्रम, सकाळी ९ वाजता डॉ. सुभाष नगराळे, ई.झेड. खोब्रागडे, अशोक जांभूळकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
तिरपुडे कॉलेज
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : काही निरीक्षणे’ या विषयावर एम.डी. महाविद्यालय साकोलीचे डॉ. अनिल नितनवरे यांचे व्याख्यान तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, सदर येथे आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १२.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.