नद्यांच्या पुनरुज्जीवनाने नागपूरच्या वैभवात भर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:05 PM2020-06-15T12:05:09+5:302020-06-15T12:07:03+5:30
यावर्षी उन्हाळ्यात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात तीनही नद्यातील गाळ व कचरा काढून स्वच्छ करण्यात आल्या. शहरातील या तिन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनामुळे सौंदर्यात भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाग, पिवळी व पोहरा या तिन्ही नद्या नागपूर शहराचे वैभव. मात्र दुर्लक्ष केल्याने एकेकाळी शहराची ओळख असलेल्या या नद्यांना नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले. मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळ्यात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात तीनही नद्यातील गाळ व कचरा काढून स्वच्छ करण्यात आल्या. शहरातील या तिन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनामुळे सौंदर्यात भर पडली आहे.
या तीनही नद्यांच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण तिची मूळ ओळख मिटवणारे आहे. उद्योगांचे घाण पाणी, सांडपाणी या नदीला सोडल्याने दुर्गंधीसोबत आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
नद्यांच्या खोलीकरणासह रुंदीकरण करण्यात आले आहे. प्रवाह मोकळा झाला आहे. नदीची संपूर्ण स्वच्छता विविध कंपन्या आणि शासकीय विभागांच्या सीएसआर निधीतून करण्यात आली आहे. नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, वेकोलि, मॉईल, एनएचएआय आदींच्या सहकार्यातून हे कार्य करण्यात आले आहे. मनपाने विविध मशीन आणि वाहनांसाठी लागणारे डिझेल पुरविले आहे.
तीनही नद्यांच्या दोन्ही बाजूला झालेल्या अतिक्रमण आणि अन्य कारणांमुळे त्यांची वास्तविक रुंदी कमी झालेली आहे. नाग नदीची एकूण लांबी १७.०५ किमी आहे. हा सर्व भाग स्वच्छ करण्यात आला आहे.
पिवळी नदीची लांबी १६.७ किमी आहे. या नदीचाही सर्व भाग स्वच्छ झालेला आहे. पोहरा नदी शंकरनगर ते नरेंद्रनगर ते पिपळा फाटा ते नरसाळा, विहीरगाव अशी वाहते. या नदीची लांबी १३.२० कि.मी. आहे. नदीचा संपूर्ण भाग स्वच्छ करण्यात आलेला आहे.
नद्यांची आता गाळ काढून व रुंदीकरण करून स्वच्छता झाली आहे. नाग नदीचे सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने काम सुरू झाले आहे. लवकरच आपल्याला नाग नदीचे स्वच्छ पाणी वाहताना दिसेल, याप्रकारचे नियोजन सुरू झाले आहे. भविष्यात नाग नदीच्या किनाऱ्यावर बगिच्यांमध्ये नागरिक व्यायाम, जॉगिंग करतील हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी कृती सुरू झाली आहे. त्यातून पर्यटनाला बळ मिळेल. नाग नदी पुनरुज्जीवित करण्याचा मनपाचा संकल्प असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. तीनही नद्या स्वच्छ झाल्या आहेत. हा ठेवा नागरिकांनी कसा जपून ठेवायचा, हे त्यांच्या हातात आहे. नागरिकांनी यात कचरा टाकू नये, जनावरे सोडू नये, जेणेकरून या नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास, दुर्गंधी टाळण्यास आणि प्रवाह असाच बाराही महिने मोकळा राहण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाचा कृतीतून सहभाग अपेक्षित आहे. नागरिकांची कृतीच हा वारसा, ही संस्कृती जपून ठेवण्यास मदत करू शकते, असेही ते म्हणाले.