दिव्यांग ई-रिक्षा चालकाला मारहाण, बर्डी ठाण्याला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:04 AM2018-10-02T00:04:23+5:302018-10-02T00:05:20+5:30
दिव्यांग ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्यामुळे विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्याला घेराव घालून आंदोलन करण्यात आले. दोषी आॅटोचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिव्यांगांनी केली. दरम्यान दुपारी सीताबर्डी पोलिसांनी दोषी आॅटोचालकाला अटक केल्यामुळे दिव्यांगांनी आपले आंदोलन मागे घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिव्यांग ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्यामुळे विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्याला घेराव घालून आंदोलन करण्यात आले. दोषी आॅटोचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिव्यांगांनी केली. दरम्यान दुपारी सीताबर्डी पोलिसांनी दोषी आॅटोचालकाला अटक केल्यामुळे दिव्यांगांनी आपले आंदोलन मागे घेतले.
विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे सदस्य शेषराव मांडवकर हे ई-रिक्षा चालवितात. २६ सप्टेंबरला दुपारी १ वाजता सीताबर्डी परिसरात ई-रिक्षा चालवीत असताना एमएच ३१, ईपी-०९८९ या क्रमांकाच्या आॅटोचालकाने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत मांडवकर यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु दोन दिवस होऊनही दोषी आॅटोचालकावर सीताबर्डी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. मारहाण करणारा दोषी आॅटोचालक खुलेआम फिरत असल्यामुळे विदर्भ विकलांग समितीचे दिव्यांग सदस्य संतापले. त्यांनी दोषी आॅटोचालकावर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्याला घेराव घातला. दिव्यांगबांधव ठाण्यात एकत्र जमले. दोषी आॅटोचालकावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोषी आॅटोचालकाला अटक केली. त्यानंतर दिव्यांग बांधवांनी आपले आंदोलन मागे घेतले.