पिस्तुलाच्या धाकावर व्यापाऱ्याला मारहाण, जरीपटक्यात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 09:36 PM2021-06-26T21:36:10+5:302021-06-26T21:44:34+5:30
Robbery पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून कुख्यात गुंड व त्याच्या साथीदारांनी एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली. मेकोसाबाग सिंधी कॉलनीत शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून कुख्यात गुंड व त्याच्या साथीदारांनी एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली. मेकोसाबाग सिंधी कॉलनीत शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मारहाणीत जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव विजय लक्ष्मणदास रुचवानी (वय ३२) असे आहे. ते रेडिमेड कपड्याचे व्यापारी आहे. शुक्रवारी मध्यरात्री ते दुकान बंद करून घरी परतले, तेव्हा त्यांना घराजवळ एक आरोपी लघुशंका करण्यासाठी दिसला. विजयने त्याला हटकले. त्यावरून आरोपी सागर यादव, कृष्णा यादव आणि त्यांच्या चार साथीदारांनी विजयवर पिस्तूल ताणले. नंतर चाकूचा धाक दाखवून आरोपींनी विजय यांना बेदम मारहाण केली. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनाही पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत आरोपी त्यांच्या बेंझ कारमध्ये पळून गेले. सिंधी कॉलनीत पहाटेपर्यंत चहलपहल असते. राधाकृष्ण मंदिराजवळ घडलेल्या या घटनेमुळे जरीपटक्यात तणाव निर्माण झाला. अनेकांनी जरीपटका ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजयची तक्रार नोंदवून घेत, आरोपी सागर यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला. शनिवारी सकाळपासूनच धावपळ करत, कृष्णा यादव नामक आरोपीला पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मैत्रिणीला भेटायला आला होता यादव
आरोपी सागर यादव हा शांतीनगरातील अट्टल गुंड आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याची मेकोसा बागेत एक मैत्रीण राहते. तो रात्री-बेरात्री तिच्याकडे येतो. सागरला मैत्रिणीकडे सोडण्यासाठी त्याचे साथीदार शनिवारी तिकडे आले होते.