नागपूर जिल्ह्यात सुरू आहे सुंदर शौचालय स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 10:31 PM2019-01-11T22:31:29+5:302019-01-11T22:33:27+5:30
शौचालयही आता स्पर्धेत उतरले आहे. सरकारने स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी शौचालयाची स्पर्धा सुरू केली आहे. ज्या ग्रामस्थांचे शौचालय, सुंदर, आकर्षक, नीटनेटके, संदेशपूर्ण राहील, अशा ४००० उत्कृष्ट शौचालयांना शासनाकडून पुरस्कृत करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शौचालयही आता स्पर्धेत उतरले आहे. सरकारने स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी शौचालयाची स्पर्धा सुरू केली आहे. ज्या ग्रामस्थांचे शौचालय, सुंदर, आकर्षक, नीटनेटके, संदेशपूर्ण राहील, अशा ४००० उत्कृष्ट शौचालयांना शासनाकडून पुरस्कृत करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत शौचालयांची रंगरगोटी करून त्यावर स्वच्छतेचे संदेश लिहिल्या जाणार आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छतेची जनजागृती व नियमित वापर करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. आपले शौचालय स्वच्छ सुंदर दिसावे व शौचालयाप्रती अभिमानास्पद स्वामित्व भावना वाटावी आणि स्वच्छता सुविधा स्पष्टपणे नजरेत याव्यात यासाठी केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील ७७६ ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेची अंतीम तारीख ३१ जानेवारी आहे. प्रत्येक कुटुंबाने स्वनिधीतून आपल्या वैयक्तिक शौचालयांची रंगरंगोटी करणे अनिवार्य असून त्यावर स्वच्छतेचे संदेश लिहिणे गरजेचे आहे.
जिल्ह्यांतर्गत कुटुंबस्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतींमधील पाच उत्कृष्ट रंगविलेल्या शौचालयांची निवड होऊन त्यांना बक्षीस व प्रमाणपत्र दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर या स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींची निवड होऊन त्यांना बक्षीस व प्रमाणपत्र दिली जाणार आहे.
गावापासून राज्यापर्यंत पुरस्कार
या स्पर्धेतून राज्यातील उत्कृष्ट तीन जिल्हे निवडले जाणार आहे. त्यांनतर संबंधित तिन्ही जिल्ह्यातील पाच उत्कृष्ट रंगविलेल्या शौचालयांची निवड केली जाणार आहे. या अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या राज्यांचे, जिल्ह्यांचे व कुटुंबांची निवड राष्ट्रीय स्तरावर पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने गठित केलेल्या समितीकडून होणार आहे.
नागपूर जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यावर शाश्वत स्वच्छता निर्माण करण्यासाठी तसेच त्याची निरंतर अंमलबजावणी होत राहण्यासाठी जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रामीण स्तरावर स्वच्छतेचा जागर होणार आहे.
संजय यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद